आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण दुर्दैवाने, लोकांना एक प्रकारे ‘मायबाप संस्कृती’तून जावे लागले. सरकारकडे हात पसरत राहा, मागत राहा, कुणाच्यातरी ओळखीसाठी मार्ग शोधत राहा हीच पद्धत होती. आम्ही ही पद्धत बदलली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले.
देशभरात 78व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह होता. ध्वजारोहण केल्यानंतर लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला व देशभरातील नागरिकांना उद्देशून सविस्तर भाषण केले. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्षपणे टीकास्र सोडले. तेव्हा समोरच्या मान्यवरांमध्ये लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधीही उपस्थित होते. मोदी म्हणाले की, आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर लोकांना ‘मायबाप संस्कृती’तून जावे लागले. सरकारकडे हात पसरत राहा, मागत राहा, कुणाच्यातरी ओळखीसाठी मार्ग शोधत राहा हीच पद्धत होती. आम्ही ही पद्धत बदलली आहे. आज सरकार स्वत: लाभार्थ्यांकडे जाते, त्याच्या घरात पाणी-वीज पोहोचवते, त्याच्या घरी गॅस पोहोचवते, सरकार स्वत: त्याला आर्थिक मदत देऊन विकास करण्यासाठी प्रोत्साहन देते. त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी पाऊलं उचलते. मोठ्या सुधारणांसाठी आमचे सरकार बांधील आहे. आपल्या देशात सवय झाली होती की देशाला कमी लेखणे, गौरवाची भावना नसणे हे दिसत होते. देशाला या गोष्टींमधून बाहेर काढण्यात आम्हाला यश आले आहे, असेही त्यांनी नमूद केले. असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. मोदी म्हणाले की, सुधारणांच्या प्रयत्नांना शक्ती दिली गेली आहे.
जेव्हा राजकीय नेतृत्वाचा संकल्प असेल, जेव्हा सरकारी यंत्रणा सुधारणा लागू करण्यासाठी समर्पण भावाने कामाला लागते, देशाचे नागरिक ते जनआंदोलन म्हणून स्वीकारतात तेव्हा निश्चित परिणाम दिसतो. या देशाने असाही काळ पाहिलाय जेव्हा ‘होईल, केले जाईल, हे तर चालेलच, आपण कशाला कष्ट करायचे? पुढची पिढी पाहून घेईल, आपल्याला संधी मिळाली आहे मजा करून घ्या, पुढचा येईल तो बघून घेईल’, असे विचार होते. कुणास ठाऊक का, पण देशात जैसे थे परिस्थितीचे वातावरण बनले होते. लोक म्हणायचे ‘सोडा, आता काही होणार नाहीये. असेच चालणार’. आम्हाला या मानसिकतेला छेद द्यायचा होता. आम्ही त्यासाठी प्रयत्न केले, अशा शब्दांत मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली. आपण संकल्प करून पुढे वाटचाल करतोही आहोत. पण हेही खरे आहे की काही लोक प्रगती पाहू शकत नाहीत. भारताचे चांगले चिंतू शकत नाहीत. जोपर्यंत स्वत:चे भलं होत नाही, तोपर्यंत इतरांचे भलं त्यांना बघवत नाही. असे मूठभर लोक, जेव्हा त्यांच्या हातात विकृती वाढत असते, तेव्हा ती सर्वनाशासाठी कारणीभूत ठरते. तेव्हा देशाचं एवढं नुकसान होते की त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागते. देशातला सामान्य नागरिक बदलाच्या प्रतीक्षेत होता. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे तो संकटांचा सामना करून गुजराण करत राहिला. आम्हाला जबाबदारी दिली गेली आणि आम्ही मोठ्या सुधारणा घडवून आणल्या. गरीब, मध्यम वर्ग, वंचित वर्ग, शहरी नागरीक, तरुणांच्या आकांक्षा यामध्ये बदल आणण्याचा मार्ग आम्ही निवडला. सुधारणेसाठीची आमची बांधिलकी पिंक पेपरच्या संपादकीयापर्यंत मर्यादित नाही. ती चार दिवसांच्या कौतुकासाठी नाही. कुठल्या नाईलाजामुळे नाहीये. देशाला मजबुती देण्याच्या निश्चयाने आहे. आम्ही राजकीय नाईलाजाने सुधारणा केलेल्या नाहीत. आम्ही राजकीय गुणाकार-भागाकाराचा विचार करत नाही, असा टोलाही मोदींनी लगावला.
Check Also
तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …