कृष्णधवलच्या काळापासून पडद्यावर भूतखेताच्या गोष्टी, भटकणारे आत्मे दाखवले गेले आहेत. भटकणार्या आत्म्यांना अनेक किश्श्यांनी जोडले जाते. कधी पुर्नजन्माच्या माध्यमातून तर कधी तंत्र मंत्रातून तर कधी नायकाच्या इर्षेतून आत्म्यांचा प्रभाव दाखविला जातो. आधुनिक बॉलिवूडमध्ये देखील अशा कथानकांवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत आणि त्याला लोकप्रियताही मिळत आहे. मात्र सर्वात मोठा फरक म्हणजे त्याला मनोरंजनाचा तडका मारला जात आहे. कारण आजकालचा प्रेक्षक केवळ घाबरण्यासाठी टॉकीजमध्ये येणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा मूड पाहून भयपट आणले जात आहेत.- सोनम परब
——–
कृष्णधवलच्या काळापासून पडद्यावर भूतखेताच्या गोष्टी, भटकणारे आत्मे दाखवले गेले आहेत. भटकणार्या आत्म्यांना अनेक किश्श्यांनी जोडले जाते. कधी पुर्नजन्माच्या माध्यमातून तर कधी तंत्र मंत्रातून तर कधी नायकाच्या इर्षेतून आत्म्यांचा प्रभाव दाखविला जातो. आधुनिक बॉलिवूडमध्ये देखील अशा कथानकांवर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत आणि त्याला लोकप्रियताही मिळत आहे. मात्र सर्वात मोठा फरक म्हणजे त्याला मनोरंजनाचा तडका मारला जात आहे. कारण आजकालचा प्रेक्षक केवळ घाबरण्यासाठी टॉकीजमध्ये येणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा मूड पाहून भयपट आणले जात आहेत.
आजकाल भूताखेतांच्या गोष्टींना कधी गंमतीने तर कधी सुडाच्या भावनेने जोडण्यात येते. मात्र अशा गोष्टींचा वाणवा नाही. भयपटांची चलती पाहता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ हॉरर कॉमेडी चित्रपटाने धमाल उडवून दिली. त्याचा सिक्वेल ‘स्त्री-2’ ने तर पहिल्याच्या तुलनेत प्रेक्षकांवर अधिक प्रभाव पाडला आहे. भुताटकीवरून यापूर्वीही देखील यशस्वी चित्रपट तयार केले आहेत. त्याचा बदलेले रुप ‘स्त्री’ अणि ‘स्त्री दोन’मध्ये पाहवयास मिळाले. फरक एवढाच की पूर्वी प्रेक्षक देखील घाबरत होते, परंतु आता त्याकडे गंमतीची गोष्ट म्हणून पाहत आहेत.
भीतीला मनोरंजनाचे कवच देऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याचा ट्रेंड हा जुनाच आहे. काही चित्रपट यशस्वी ठरले तर काहींनी अनेकांच्या मनात भिती निर्माण केली. अजूनही या चित्रपटांतून चुडेल, नृत्य करणारी मंजुलिका, ‘भूतनाथ’मध्ये लहान मुलांचा मित्र होणारी आत्मा, झोंम्बी पाहून पळणारे लोक हे सर्व काही पाहिले गेले. अनुष्का शर्मासारख्या नव्या जमान्यातील अभिनेत्रीने ‘फिल्लोरी’ मध्ये भूताची भूमिका करत प्रेक्षकांना वास्तवात काय हवे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूडच्या इतिहासात पहिला भयपट 1949 मध्ये झळकला. कमाल अमरोही यांचा ‘महल’ कमालीचा गाजला. अशोककुमार, मधुबालाच्या चित्रपटात पहिल्यांदा भटकणारी आत्मा दिसली. पण क्लायमेक्समध्ये अशा प्रकारे कोणतिही आत्मा नसून ती एक महिला असते, हे प्रेक्षकांना कळून चुकते. 1962 मध्ये बीस साल बाद, 1964 मध्ये वो कौन थी आणि 1965 मध्ये भूतबंगला हे चित्रपट एकाच पठडीतील होते आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनात भिती निर्माण करत मनोरंजन केले.
भटकणार्या आत्म्यांना भूत केले
बहुतांश चित्रपटांत भुताटकी किंवा भटकणारी आत्मा यास प्रेमभंगामुळे बदला घेण्याच्या भावनेला जोडले गेले. 1968 मध्ये ‘नीलकमल’ हा चित्रपट आत्म्याचीच कहानी सांगणारा होता. मूर्तीकार चित्रसेनच्या कामाने आनंदी होत राजा त्याला वर मागण्यासाठी सांगतो. तेव्हा चित्रसेन हा राजकुमारी नीलकमलला मागतो. त्यामुळे चिडलेला राजा त्याला शिक्षा म्हणून जीवंतपणे भिंतीत गाडतो. पुढच्या जन्मी ‘नीलकमल’चा जन्म सीतेच्या रुपातून होतो. तेव्हा चित्रसेनची आत्मा त्याला रात्री बोलावत असते आणि ती देखील देहभान हरपून त्या आवाजाकडे जात असते. या चित्रपटात राजकुमार, मनोजकुमार आणि वहिदा रेहमान यासारखे दिग्गज कलाकार होते.
केवळ वाईटच नाही तर चांगलेही भूत
अनेक वर्षांपासून चित्रपटात दोन प्रकारचे भूत दाखविले गेले. एक बदला घेणारे आणि दुसरे मदत करणारे. 1980 आणि 1990 च्या दशकांत रामसे ब्रदर्सने साकारलेले भयपट आजही प्रेक्षकांना भितीदायक वाटतात. भेसूर, अक्राळविक्राळ चेहरा, अस्वलासारखे केस असलेले भूत पडद्यावर आणले. त्यानंतर या भूतांचा शेवट त्रिशूळ किंवा क्रॉसने होताना दाखविला गेला. यादरम्यान मल्टीस्टारर ‘जानी दुश्मन’ चित्रपट झळकला. यात संजीवकुमार हे असे भूत असते की नववधूची लाल साडी पाहिली की, त्यांच्या अंगातील भूत जागा होत असतो. पण चित्रपटातील भूत हे केवळ नुकसानच करतात असे नाही तर काहीवेळा मदत करणारे भूत देखील दाखविले आहे. भूतनाथ, भूतनाथ रिटर्न आणि ‘अरमान’यात अमिताभ बच्चन यांनी अशाच प्रेमळ भूताची भूमिका साकारली. ‘हॅलो ब्र्रदर’मध्ये सलमान खान भूत झाला आणि अरबाजच्या शरीरात प्रवेश करून मदत करताना दाखविला आहे. ‘चमत्कार’मध्ये नसिरुद्दीन शहा हे शाहरुख खानला बदला पूर्ण करण्यासाठी मदत करतात. ‘भूत अंकल’मध्ये जॅकी श्रॉफ आणि ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ मध्ये शाहिद कपूरला ‘यमराज’ संजय दत्तच्या मदतीने चांगले होताना दाखविले आहे. ‘टारझन द वंडर कार’ची कथा देखील अशीच होती. प्यार का साया, मा हे दोन्ही चित्रपट चांगल्या भूतांचे होते.
बड्या दिग्दर्शकांनी साकारले भूत
विक्रम भट्टसारख्या बडया निर्मात्यांना देखील असा भयपट तयार करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ‘राज’च्या यशानंतर अनेक सिक्वेल तयार केले. 1920, 1920 ईव्हील रिटर्न, शापित, ‘हाँटेड’ मध्ये आत्म्याशी भेट घालून दिली. 2003 मध्ये अनुराग बासूसारख्या दिग्दर्शकांनी ‘साया’ सारखा चित्रपट साकारला. रामगोपाल वर्मा यांच्यासारख्या प्रयोगशील दिग्दर्शकाने ‘भूत’ नावानेच चित्रपट आणला. त्यानंतर फूंक, फूंक-2, डरना मना है, डरना जरुरी है, वास्तू शास्त्र, भूत रिटर्न देखील आणले. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित चित्रपट ‘मुंज्या’ हा देखील हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. एका खट्याळ आत्म्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. एक मुलगा काळी जादू करत असताना चुकीने एका वाईट आत्म्याला बंधनातून मुक्त करतो, असे त्याचे कथानक. याच दिग्दर्शकाचा आणखी एक चित्रपट ‘ककुडा’ देखील हॉरर कॉमेडी चित्रपट होता. प्रियदर्शनचा चित्रपट ‘भूलभुलैय्या’ (2007) मध्ये अक्षयकुमार, विद्या बालन आणि शायनी आहुजाने भूमिका केली. या चित्रपटात मंजुलिका नावाची भूत सर्वांना भिती दाखवत असते. चित्रपटाचा सिक्वेल भूलभुलैय्या-2 (2022) मध्ये मंजुलिकाचीच कहानी आहे. परंतु नायक अणि नायिका बदलल्या आहेत. सिक्वेलचे दिग्दर्शनही अनिस बाझ्मी यांनी केले आणि कार्तिक आर्यन आणि कियारा अडवानी हे नायक आणि नायिका आहेत. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रुही’चे दिग्दर्शन हार्दिक मेहता यांनी केले आहे.
सत्य घटनांवरचे भयपट
चित्रपटाचा इतिहास पाहिला तर अनेक भयपट प्रदर्शित झाले आणि त्यांनी तिकीटबारीवर दणदणीत यश मिळवले. काही चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले तर काही भयपट सत्य घटनांवर आधारित आणले. अक्षयकुमारचा ‘भूलभुलय्या’ हा बंगाली मुलीच्या सत्य घटनेवर आधारित होता. राजकुमार रावचा ‘रागिनी एमएसएम’ देखील दिल्लीतील एका मुलीवरचा होता. राजकुमार रावचा आणखी एक चित्रपट ‘स्त्री’ देखील कर्नाटकातील एका गावातील सत्य घटनेवर आधारित आहे. कुणाल खेमूचा ‘ट्रिप टू भानगड’मध्ये दाखविलेले दृश्य प्रत्यक्षातही घडलेले आहे. उर्मिला मातोंडकरचा ‘भूत’ चित्रपट हा मुंबईत राहणार्या एका जोडप्याची खरी कहानी होती. भयपट आवडण्याचे कारण म्हणजे या चित्रपटांतील गुढ प्रत्येकवेळी नव्या रुपातून समोर येते. त्यामुळे सामान्य कथानकांपेक्षा ही कथा वेगळी भासू लागते. म्हणूनच प्रत्येक काळात भयपटांची निर्मिती झाली आणि होत राहिल.
हिंदीप्रमाणे इंग्रजी आणि मराठी चित्रपटांतही भयपटांची चलती राहिली आहे. इंग्रजीतील भयपट हिंदीच्या तुलनेत अधिक भयावह असतात. कॉन्झुरिंग, इन्सेडियस, एव्हिल डेड, राँग हाऊस. राँग टर्न यासारखे भयपट लहान मुलांना पाहू देण्यास मनाई करतात. मराठीतही अशोक सराफ यांचा एक डाव भूताचा चित्रपट गाजला होता. महेश कोठारे यांचा झपाटलेला तर अजूनही लोकप्रिय आहे. भरत जाधव यांचा ‘पछाडलेला’ देखील प्रेक्षकांना भावला.
Check Also
चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या …