लेख-समिक्षण

बॉलीवूडची पिछेहाट, ‘साऊथ’ सुसाट

असं म्हटलं जातं की जगात फक्त सातच कथा आहेत, ज्या वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा-पुन्हा सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये सातच चेहरे वारंवार समोर येतात. अक्षय कुमार, तिन्ही खान, दीपिका पदुकोण, कपूर कुटुंब आणि करण जोहर. हे लोक एकाच कथेला वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा सांगतात. ही म्हण अलीकडे खरी ठरली, जेव्हा ‘हाऊसफुल ५’च्या ओपनिंग शोच्या वेळी पीव्हीआर ऑडिटोरियम पूर्णतः ओस दिसले. वरवर पाहता प्रमुख बुकिंग अ‍ॅप्स ६० टक्के तिकिटं विकली गेल्याची भ्रामक माहिती देत होते, पण प्रत्यक्षात थिएटर जवळपास रिकामेच होते.
अक्षय कुमारच्या या कॉमेडी चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि नाना पाटेकर यांच्यासह एकूण १९ कलाकार आहेत. या चित्रपटाने सहा जूनच्या ओपनिंग डे ला फक्त २४ कोटींचाच व्यवसाय करू शकला. हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात शंभर कोटींचा व्यवसायही करू शकला नाही. सोशल मीडियावर या चित्रपटाला वाह्यात ठरवण्यात आले. युट्यूबवर ट्रेलरला पहिल्या २१ तासांमध्ये फक्त ८० लाख व्ह्यूज मिळाले, जे अक्षय कुमारच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत खूपच कमी होते. चित्रपटाचं अपयश झाकण्यासाठी आणि रिकाम्या थिएटरकडून लक्ष हटवण्यासाठी तिकिटविक्रीची फुगवलेली आकडेवारी देण्यात आली. ही गोष्ट बॉलिवूडमधील मोठ्या नावांच्या सध्याच्या संकटाकडे लक्ष वेधते. बॉलिवूडच्या स्टार्सचा झगमगाट आता फिका पडतोय. यामुळे देशाच्या १९,००० कोटी रुपयांच्या मनोरंजन उद्योगाला धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, हिंदी सिनेमा डगमगत आहे, तेव्हा दक्षिण भारतीय सिनेमा उंच झेप घेत आहे. हे बॉलिवूडमधील सर्जनशीलतेच्या दुष्काळाकडे इशारा करतं. ‘हेराफेरी’ आणि ‘वेलकम’सारख्या चित्रपटांमुळे ‘खिलाडी’ अक्षय कुमारची एकेकाळी लहान शहरांत मोठी क्रेझ होती, पण ‘स्काय फोर्स’, ‘केसरी २’ आणि आता ‘हाऊसफुल ५’सारखे चित्रपट फ्लॉप ठरले आणि शंभर कोटींचाही व्यवसाय करू शकले नाहीत.
‘हाऊसफुल ५’ला हिट बनवण्यासाठी, विशेषतः मुलगा अभिषेकसाठी अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर पुढाकार घेतला. तरीसुद्धा चित्रपट दोन दिवसांत ५४ कोटींपेक्षा अधिक व्यवसाय करू शकला नाही. ‘कल्कि २८९८ ए.डी.’ चित्रपटात अमिताभच्या भूमिकेची चर्चा मुख्यतः दक्षिण भारतातील प्रेक्षकांमुळेच झाली. ही बाब बॉलिवूडचे स्टार्स आता काही प्रमाणात बाह्य घटकांवर अवलंबून राहिल्याचं सूचित करते.
सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट फक्त २६ कोटींचा व्यवसाय करू शकला, तर त्याचा बजेट २०० कोटींचा होता. कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट फक्त १८.४ कोटींचा व्यवसाय करू शकला. अनुपम खेर यांनी कंगनाच्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनाचं कौतुक केलं, पण प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारलं, अगदी तसंच जसं त्यांनी खेर अभिनीत ‘द व्हॅसिन वॉर’लाही नाकारलं.
२०२३ मध्ये ‘पठाण’ने १,०५५ कोटींचा व्यवसाय करत शाहरुख खानने पुन्हा आपली चमक दाखवली. पण २०२४ मध्ये त्याचं पान मसाला जाहिरातीत दिसणं आणि फारशा सिनेमांचा अभाव यामुळे त्याची प्रतिमा मलीन झाली. रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ने ५५३ कोटींची कमाई केली, पण २०२४ मध्ये माधुरी दीक्षितसोबतचा ४०० कोटींचा चित्रपट तसा व्यवसाय करू शकला नाही. २०२२ मधील ‘शमशेरा’ सुपर फ्लॉप ठरला. दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ फ्लॉप झाला, पण ‘कल्कि २८९८ ए.डी.’च्या यशासाठी ती दक्षिण भारतीय प्रेक्षकांवरच अवलंबून राहिली.
नामांकित स्टार्स असलेल्या चित्रपटांचे हे अपयश मनोरंजन उद्योगाचं गळा दाबत आहे. २०२४ मध्ये एकूण तिकीट विक्री १.२ अब्ज होती, पण २०२३च्या तुलनेत थिएटरमध्ये चित्रपट पाहणार्‍यांची संख्या १० टक्क्यांनी घटली आणि उत्पन्नात १३ टक्के घट झाली.
२०२४ मध्ये ‘स्त्री २’, ‘भूलभुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ यांसह एकूण सहा हिंदी चित्रपटांनी शंभर कोटींचा आकडा पार केला, तर २०२३ मध्ये शंभर कोटींचा व्यवसाय करणार्‍या हिंदी चित्रपटांची संख्या सोळा होती. जवळपास ९.६ कोटी सदस्य असलेलं ओटीटी प्लॅटफॉर्म महिन्याला फक्त १००-२०० रुपयांत भरपूर सामग्री देतं, जे प्रेक्षकांसाठी अतिशय स्वस्त आहे. २०२३ मध्ये ४०० चित्रपट थेट थिएटरऐवजी ओटीटीवर आले, जे २०२२च्या तुलनेत ३० टक्क्यांनी जास्त होते. थिएटरमध्ये बॉलिवूडच्या पोकळीची जागा प्रभास आणि एनटीआर जूनियरसारखे दक्षिण भारतीय स्टार भरून काढत आहेत, तर मल्याळम आणि गुजराती चित्रपटांची बाजारातील भागीदारी वाढली आहे.
दुसर्‍या बाजूला, दक्षिण भारतीय चित्रपट धडाकेबाज यश मिळवत आहेत. ‘पुष्पा २’च्या डब हिंदी आवृत्तीनं ८८९ कोटींचा, ‘कल्कि २८९८ ए.डी.’ने ५५० कोटींचा आणि ‘देवरा’ने ३०० कोटींचा व्यवसाय केला आणि बॉलिवूडच्या सर्वोत्तम चित्रपटांनाही मागे टाकलं. तरी ‘छावा’ने ५६७ कोटींचा व्यवसाय करत दाखवलं की बॉलिवूड अजूनही चांगले चित्रपट देऊ शकतो. या चित्रपटात दिसून आलेला मराठी गौरव, दक्षिण भारतीय सिनेमाच्या सांस्कृतिक बळाशी साधर्म्य राखणारा आहे.
जावेद अख्तर यांच्या मते, बॉलिवूडच्या शहरी उच्चभ्रू स्टार्सच्या तुलनेत अल्लू अर्जुनसारखे सावळे दक्षिण भारतीय अभिनेते थेट प्रेक्षकांशी संपर्क साधतात. फॅशन आणि ग्लॅमर विकण्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या बॉलिवूडमुळे ग्रामीण प्रेक्षक या चित्रपटांपासून दूर होत आहेत. राजकीय विचारधाराही बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशाचे एक कारण आहे. कंगनाचा ‘इमर्जन्सी’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ हे राष्ट्रवादी सूर असलेले चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले. तसेच शाहरुख आणि आमिर खानचे चित्रपट हिंदुत्ववाद्यांना पटले नाहीत. दीपिका पदुकोण, अक्षय कुमार आणि कंगना रणौत यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक केले तरीही त्यांच्या फिल्म्स हिट होत नाहीत, कारण प्रेक्षक विचारधारेवर आधारित चित्रपट नाकारत आहेत. रटाळ कथानके, प्रेरणा देऊ न शकणारे गाणी आणि शहरी उच्चभ्रू वर्गाशी बहुसंख्य जनतेचे अंतर यामुळे बॉलीवूडचा चकाकणा सूर्य मावळत आहे.
२०१८ मध्ये थिएटरमध्ये जाणार्‍यांची संख्या १.६ अब्ज होती, ती २०२५ मध्ये ८० कोटींवर आली. जर मुंबईने स्वतःचं भविष्य ओळखण्यात अपयश मिळवलं, तर २०३५ मध्ये बॉलिवूड एक भुताटकी शहर होऊन जाईल. तोवर सिंगल स्क्रीन पूर्णपणे नाहीशा होतील, मल्टीप्लेसमध्ये दक्षिणेकडील हिट चित्रपट दाखवले जातील आणि हिंदी सिनेमाचे सुपरस्टार फक्त युट्यूबवरच दिसतील.- सोनम परब

Check Also

विमान अपघातांचे रुपेरी चित्रण

अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. …