लेख-समिक्षण

बघ्यांच्या गर्दीत हरवल्या संवेदना

‘क्रांतिवीर’ चित्रपटातला ‘आ गये मेरे मौत का तमाशा देखने…..’. हा संवाद लोकप्रिय झाला. पण सध्याच्या काळात मोबाईलमध्ये व्यग्र झालेल्या आणि रीलमध्ये आकंठ बुडालेल्या समाजाला तंतोतंत लागू पडतो. अपघाताच्या ठिकाणी, दुर्घटनेच्या स्थळी, अत्याचार, अन्याय होत असताना ते रोखण्याऐवजी त्याचे शूटिंग करण्याची मानसिकता ही अशा विकृतीला नकळतपणे प्रोत्साहन देत आहे. सोशल मीडियात हरविलेल्या समाजात हत्या, हल्ला, अपघात, मृत आणि जखमी लोक हे केवळ तमाशाचा भाग राहिले आहेत.बघ्याची भूमिका घेणारा समाज म्हणून ओळख निर्माण होणे ही शोकांतिका आहे. द्रौपदीचे भरसभेत वस्रहरण झाले तेव्हा योद्धे भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य, शल्य, जयद्रथ, भगदंत यांनी मौन बाळगले. पण महाभारतात ते दुर्योधनाच्या अगोदरच मारले गेले. दुर्योधन नंतर मारला गेला, हे लक्षात ठेवा.
1990 च्या दशकांत एक गाजलेला चित्रपट क्रांतिवीर हा सर्वांनीच पाहिला असावा. या चित्रपटातील शेवटच्या प्रसंगात अभिनेते नाना पाटेकर यांना सार्वजनिकरित्या फाशीची शिक्षा दिली जाणार असते. तेथे जमलेले लोक पाहून नाना पाटेकर म्हणतात, ‘आ गये मेरे मौत का तमाशा देखने’. हा संवाद विलक्षण लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे, 34 वर्षांनंतर आज विचार केल्यास सध्याच्या मोबाईलमध्ये व्यग्र झालेल्या आणि रीलमध्ये आकंठ बुडालेल्या समाजाला तो संवाद तंतोतंत लागू पडतो. अपघाताच्या ठिकाणी, दुर्घटनेच्या स्थळी, अत्याचार, अन्याय होत असताना ते रोखण्याऐवजी त्याचे शूटिंग करण्याची नवमानसिकता नाना पाटेकरच्या संवादांना स्मरण करायला भाग पाडते.
मध्य प्रदेशातील उज्जैन ही महाकालची नगरी. तेथे अनेक रहस्यमय तथ्य आढळून येतात आणि ठिकाणही अलौकिक. पण या अद्भूतनगरीत घडलेला प्रकार हा धक्कादायक, क्लेषदायक. या प्राचीननगरीत एका वर्दळीच्या रस्त्यालगत बलात्कार होतो. तेथूनच लोक ये जा करतात. सर्वजण तो भयंकर प्रकार पाहतात. काही जण स्वत:च्या फोनमध्ये व्हिडिओ तयार करतात. मात्र आरोपीला रोखण्यासाठी कोणीही आरडाओरडा करत नाही, पोलिसांनाही कळवले जात नाही. सर्व जण तमाशा पाहत राहतात. अगदी निर्विकार भावनेतून निघून जातात. यापैकी काही जणांनी तो व्हिडिओ व्हायरल केला. तो वादग्रस्त व्हिडिओ पोलिसांच्या नजरेत आल्यानंतर आरोपी आणि व्हिडिओ तयार करणारा महाभाग या दोघांनाही मुसक्या बांधल्या. ही घटना अतिशय विचित्र आणि गंभीर. कारण रस्त्याच्या बाजूलाच होणारा बलात्कार आणि त्याचे चित्रिकरण. अन्यथा ही घटना असंख्य घटनांपैकीच एक बनून राहिली असती, जेथे मदत करण्याऐवजी व्हिडिओ तयार करण्यालाच प्राधान्य दिले जाते. सोशल मीडियात हरविलेल्या समाजात हत्या, हल्ला, अपघात, मृत आणि जखमी लोक हे केवळ तमाशाचा भाग राहिले आहेत. जेव्हा माणसाच्या आयुष्याचा तमाशा होतो तेव्हा काही अपेक्षा ठेवता येऊ शकते का? मुद्दा केवळ उज्जैन येथील बलात्काराच्या घटनेचा नाही तर तुमचा-आमचा आहे, ठिकाणांचा आहे, संवेदनशीलतेचा आहे. सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ पाहा, त्या घटना उज्जैनशी मिळत्याजुळत्या वाटू शकतात आणि त्याचे असंख्य व्हिडिओ, रीलही मिळतील.
मध्यंतरी, लखनौत एक इमारत कोसळली. अनेक जण त्याखाली दबले. आपल्यापैकी काही जणांना मदतीची संधी मिळाली. परंतु त्यांनी मदतीचा हात पुढे करण्याऐवजी कॅमेरा काढत त्याचे व्हिडिओ तयार केले. ढिगार्‍याखाली दबलेला व्यक्ती जीवंत आहे की मृत याच्याशी काही देणेघेणे नव्हते. फक्त व्हिडिओ काढण्यापुरती त्यांचा संबंध होता. एवढेच नाही तर काही लोकांनी ढिगार्‍याखाली दबलेल्या लोकांचा व्हिडिओ हा व्हॉटसअप स्टेट्सला ठेवला. काय म्हणावे याला? संवेदनशीलता नावाची गोष्ट आहे की नाही? की एखाद्या आपत्तीचे केवळ फोटो काढणे, व्हिडिओ शूट करणे एवढेच काम राहिले का?
मदत आणि सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनही अशाच प्रकारचा अनुभव येत आहे. अनेक ठिकाणी मदत करण्याचे सोडून व्हिडिओ तयार करण्यासाठी काही मंडळी पुढे सरसावत असतात. शेवटी पोलिस देखील आपल्याच समाजाचा भाग आहेत. पोलिस हा कोणत्याही समाजाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. सध्याच्या काळात स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे जगाचा कायापालट झाल्याचे म्हटले जाते. यानुसार आपले वर्तन, विचार, पद्धत, दृष्टीकोन, भूमिका या सर्व गोष्टी बदलल्या आहेत. आपण शब्दकोशाप्रमाणे स्मार्ट आणि सोशल होऊ शकत नाहीत. पण आपला फोन स्मार्ट असतो आणि त्याचे अंतीम ध्येय सोशल मीडिया असते. कोणत्याही गोष्टींचा चुकीचा वापर हा कोणत्या थरापर्यंत होऊ शकतो, हे जीवंत उदाहरण म्हणावे लागेल. परंतु या रोगाचा प्रार्दुभाव, चुकीच्या कामासाठी वापर करणे या गोष्टी आपल्यासाख्या देशात अधिक आहे. श्रीमंत आणि विकसित देशात अनेक रोग असतील, परंतु अशी वैचारिक दिवाळखोरी खूपच कमी दिसते. या संदर्भात आपण माकडाच्या हाती कोलीत असे म्हणायला नको का? अगदी जशी देशात स्वातंत्र्य आणि लोकशाहीची अवस्था झाली, तशीच माणसांकडून हाताळल्या जाणार्‍या मोबाईलची झाली आहे. आणखी एका बाजूचा विचार करता येईल. जेव्हा स्मार्टफोन नव्हते, सोशल मीडिया नव्हता, तेव्हा नागरिक, पादचारी हे मदतीला धावत नव्हते का? तर नाही. अनेक दशकांपूर्वी सोशल मीडिया नव्हता आणि मोबाईलही नव्हता. तेव्हा अलाहाबाद येथे कालका मेलचा मोठा अपघात झाला. या ठिकाणी पोचलेल्यां नागरिकांनी आणि पोलिसांनी मदत करण्याऐवजी जखमी आणि मृत प्रवाशांना लुटण्याचे काम केले. किल्लारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे साहित्य चोरीस जाण्याचे प्रकार घडल्याचे आजही सांगितले जाते. आजही या स्थितीत बदल झाला आहे का? प्रत्येक घटनेनंतर हलकल्लोळ माजतो पण तो अधिक नाटकीय वाटतो. जनक्षोभातून कडक कायदा अणि फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाते. परंतु इतिहासाचे आकलन केले तर या गोष्टी गुन्हे थांबविण्याऐवजी प्रामुख्याने जनतेच्या मनातील असंतोष कमी करण्यासाठी केल्या जातात. लोकांसमोर अनेक प्रस्ताव मांडत आपले नेते कसेबसे लोकांचे समाधान करत राहतात. परंतु सर्वच पातळीवर सखोल आणि गांभीर्याने व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्याच्या दृष्टीने पावले टाकताना कोणी दिसत नाही. एक ताजे उदाहरण घेता येईल. कोलकता येथील आर.जी कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील घटनेनंतर अपराजिता विधेयक मांडण्यात आले. त्यात आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद केली आहे. 2013 मधील निर्भया कांडानंतर देखील अशाच प्रकारच्या कडक कायद्याचे मलम लावण्यात आले. प्रत्यक्षात सांख्यिकी मंत्रालयातील आकडे पाहिले तर 2022 मध्ये बलात्काराच्या सर्व प्रकरणात केवळ अडीच टक्के (2.56 टक्के) प्रकरणात दोष सिद्ध झाले आहेत. एकापरीने न्यायालयीन प्रक्रियेत सामर्थ्य दिसत नसल्याने शिक्षेतील गंभीरपणा निघून जातो. एकीकडे विकासाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या देशात सामाजिक दृष्टीकोनात बदल का झाला नाही? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित त्याचे मूळ कायदा आणि न्यायव्यवस्थेबाबत असणारा अविश्वास आणि धास्ती असू शकते. त्याचबरोबर आपले शिक्षण. यात जीवन जगणे, दुसर्‍याशी व्यवहार, स्वातंत्र्य देण्याचे मुद्दे आहेत. अर्थात प्रत्येक घरात इंटरनेट आणि हातात स्मार्टफोन येणे आणि खिशात पैसे असणे म्हणजे समाजाचा विकास झाला, असे म्हणता येणार नाही. आपला तमाशा पाहणारा समाज म्हणून ओळख निर्माण झालेली असताना ही चौकट कधी मोडणार ? यासाठी त्याचा मार्ग कोणीही दाखवलेला नाही. कदाचित त्यात कोणाला रसही नसेल आणि त्यात फायदा देखील दिसत नसेल. प्रत्येक गोष्टीचा शेवटचा उपाय आपणच आहोत. कायदा आणि सरकार हे आपणच आहोत. जरा विचार करा आणि स्वत:च उपाय शोधून काढाा. कदाचित आपण नाही परंतु आगामी पिढीत बदलाचे जीन्स आणू. द्रौपदीचे भरसभेत वस्रहरण झाले तेव्हा योद्धे भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य, शल्य, जयद्रथ, भगदंत यांनी मौन बाळगले. पण महाभारतात ते दुर्योधनाच्या अगोदरच मारले गेले. खरे तर दुर्योधन हा नंतर मारला गेला. आपण सर्वजण व्हिडिओ तयार करतानाच मेलो, असे वाटत नाही का?-योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक

Check Also

तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *