लेख-समिक्षण

फाईनमन यांची जीवनसूत्रे

रिचर्ड फाईनमन हे नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे तीव्र बुद्धिमत्ता, अनिश्चिततेची स्वीकारार्हता आणि बालसुलभ कुतूहल यांचं विलक्षण मिश्रण होतं. बालपणी ते उशिरा बोलायला शिकले. तरीही त्यांना ‘अतिशय बोलके वैज्ञानिक’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मोकळ्या वेळेत ते चित्रकला करत असत. त्यांनी पोर्तुगीज भाषाही फक्त ब्राझीलमधील सहकार्‍यांना प्रभावित करण्यासाठी शिकली होती!
प्रत्येकाला जिंकायचं असतं, पण कोणी खेळ खेळायला तयार नसतं. फाईनमन म्हणायचे: कोणतीही गोष्ट खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच रंजक असते. म्हणून नवीन गोष्टींचा अनुभव घ्या, आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, त्यावर मनापासून आणि मनसोक्त मेहनत करा.
त्यांच्या आत्मचरित्राचा सारांश म्हणजे तुम्हाला काय व्हायचंय याचा विचार करू नका, तर काय करायचंय याचा विचार करा. लोक काय म्हणतील याची चिंता करू नका. मात्र, किमान शैक्षणिक पात्रता टिकवून ठेवा, जेणेकरून समाज तुमचं काही करायला अडवणार नाही.
फाईनमन म्हणत की, जेव्हा तुम्हाला काही माहिती नसतं, तेव्हा ते कबूल करणं महत्त्वाचं असतं. अज्ञानात कधीही लाज वाटू नये. खरी लाज म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट कळत नाही, तरीही तुम्ही सगळं समजतंय असं दाखवता तेव्हा वाटायला हवी. म्हणून जास्तीत जास्त वाचा आणि प्रात्यक्षिक अनुभवावर भर द्या. आयुष्य एकदाच मिळतं, हे तत्वज्ञान मांडणारे फाईनमन हे पहिले व्यक्ती होते. ते म्हणत आयुष्यात काय करायचं यापेक्षाही काय करायचं नाही हे शिकून घ्या. जीवन म्हणजे सतत प्रगल्भ होत जाण्याची प्रक्रिया आहे. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, स्वतःचा विचार करा आणि सत्य स्वतः शोधा.
फाईनमन वैज्ञानिक झाले, ते कीर्तीसाठी नव्हे, तर त्यांना विज्ञानात जग समजून घेण्याची मजा वाटायची. माझा विज्ञानातला रस फक्त जगाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आहे, असे ते सांगत.
त्यामुळे, तुम्ही काहीही व्हा, पण ते मनापासून आवडतं म्हणून करा. रिचर्ड फाईनमन यांनी आपल्याला शिकवलं की बुद्धिमत्ता ही एक गोष्ट आहे, पण ती जर जिज्ञासेशी जोडली गेली तर ती जग बदलू शकते हे खरे नाही काय?

Check Also

ऊर्जादायी यशोगाथा

विल्यम कमक्वांबा यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी आफ्रिकेतील मलावी देशाच्या कसुलु नावाच्या एका खेड्यात …