लेख-समिक्षण

प्रतिभावंत खगोलशास्त्रज्ञ

डॉ. जयंत नारळीकर यांना नुकतीच 86 वर्षेपूर्ण झाली. 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे जन्मलेल्या नारळीकर यांना घरातूनच विद्वत्तेचा वारसा लाभला. 1959 मध्ये केंब्रिज विद्यापीठाची ’ट्रायपास’ ही गणितातील अवघड परीक्षा वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पास होऊन वडिलांप्रमाणे ते रँगलर झाले. यानंतर त्यांनी खगोलशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व उत्पत्तीसंबंधी संशोधन करून सिद्धांत मांडला. ’अंतर्गत स्फोट होऊन सूर्यापासून पृथ्वी आणि इतर ग्रह निर्माण झाले’ हा त्यांच्या सिद्धांताचा मुख्य आशय. त्यानंतर 1972 पर्यंत तेथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमी’मध्ये संशोधनकार्य केले. आपल्या संशोधनाचा आपल्या देशाला उपयोग व्हावा म्हणून ते 1972 मध्ये भारतात परतले व मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेत दाखल झाले. तेथे ते अनेक मानाची व जबाबदारीची पदे भूषवित 1989 पर्यंत कार्यरत राहिले. याचवेळी त्यांनी पुणे विद्यापीठात ’आयुका’ (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनोमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) या खगोलशास्त्रातील प्रगत अध्ययन केंद्राची अथक परिश्रमातून उभारणी केली.
अंतराळातील ग्रह, तारे, नक्षत्रे यांची माहिती देण्यासाठी डॉ. नारळीकरांनी आकाशदर्शनाचे कार्यक्रम घडवून आणले. डॉ. नारळीकरांचे जगभर गाजलेले संशोधन म्हणजे त्यांनी डॉ. हॉएल समवेत मांडलेला गुरुत्वाकर्षण सिद्धांत होय. माखच्या सिद्धांताचे गणितीय विश्लेषण डॉ. नारळीकरांनी आपले गुरू डॉ. हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली केले. ‘जर विश्वात एकच कण असेल तर त्याला वस्तुमान असणार नाही. पण आणखी एक दुसरा कण निर्माण झाला तर दोन्ही कण एकमेकांना वस्तुमान पुरवतील’ हा त्यांनी यासंदर्भात मांडलेला सिद्धांत. या सिद्धांताच्या आधारे विश्वातील प्रत्येक वस्तूची निर्मिती व अंत सांगता येतो. त्यामुळे आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या समीकरणांपेक्षा डॉ. नारळीकरांची समीकरणे प्रभावी ठरतात.
डॉ. नारळीकरांनी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी विज्ञानाच्या क्षेत्रातील महान पराक्रम केल्याने त्यांची गणना जगातील थोर खगोलशास्त्रज्ञांमध्ये केली जाते हे खरे नाही काय?

Check Also

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *