लेख-समिक्षण

पुन्हा एकदा संशयकल्लोळ

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जी ’ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केली ती निश्चितच अभिनंदनीय असली, तरी आता या कारवाईचा धुरळा खाली बसल्यानंतर संशयाचे जे नवीन धुके निर्माण होऊन पहात आहे त्याचाही विचार करावा लागणार आहे. या संपूर्ण मोहिमेमध्ये देशातील सर्वच राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली, तरी काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने या कारवाईतील सत्य समोर आणावे अशी मागणी करण्यात येत होती. या लष्करी संघर्षामध्ये पाकिस्तानने भारताची काही विमाने पाडली का, असा प्रश्नही सतत काँग्रेसतर्फे उपस्थित करण्यात येत होता. पण सरकारतर्फे त्याबाबत नेहमीच नकारात्मक उत्तर देण्यात येत होते. पण आता आता देशाचे सरसेनाअध्यक्ष अनिल चौहान यांनी एका परकीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या लष्करी कारवाईत भारताची विमाने पडल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याने काँग्रेसने उपस्थित केलेला प्रश्न अधोरेखित होत आहे. या लष्करी संघर्षामध्ये भारताची किती विमाने पडली याचा विचार करण्यापेक्षा भारताने चुका सुधारूण नंतर यशस्वीपणे कारवाई पूर्ण केली हे जास्त महत्त्वाचे असल्याचे विधान अनिल चौहान यांनी केले आहे. साहजिकच आता भारत सरकारला याबाबत जो संशय निर्माण झाला आहे तो दूर करावा लागणार आहे. कोणत्याही लष्करी संघर्षामध्ये यात सहभागी असणार्‍या दोनही बाजूंची हानी होतच असते. त्यात वेगळे काही नाही. त्यामुळे जर या लष्करी संघर्षामध्ये भारताची काही विमाने पाडली असतील किंवा त्यांना नुकसान पोहोचले असेच तर ते मान्य करण्यात काही वेगळे आहे असे नाही. या लष्करी संघर्षामध्ये भारत पाकिस्तानपेक्षा वरचढ होता हे दाखवण्याच्या नादामध्ये जर काही गोष्टी लपवल्या जात असतील, तर मात्र ते गंभीर मानावे लागेल. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष संपवण्यामागे अमेरिकेची महत्त्वाची भूमिका असल्याची घोषणा केली आहे. लष्करी संघर्षाला पूर्णविराम देण्यामागे अमेरिकेचा कोणताही हात नव्हता अशी भूमिका जरी भारत सरकारने घेतली असली तरी ट्रम्प यांनी आतापर्यंत किमान ११ वेळा या विषयाचा पुनरुच्चार केला आहे हेसुद्धा विसरता येत नाही. म्हणूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षामध्ये अमेरिकेची निश्चित भूमिका काय याबाबतही संशयाचे धुके निर्माण झाले आहे. अद्यापही या विषयातील अनेक गोष्टी स्पष्टपणे समोर आलेल्या नाहीत. भारताने या लष्करी संघर्षामध्ये पाकिस्तानवर संपूर्णपणे मात केली हे जरी वास्तव असले, तरी या निमित्ताने भारताचे किती लष्करी नुकसान झाले ही गोष्टसुद्धा समोर येणे आवश्यक आहे. सरकारी पातळीवर अधिकृतपणे जोपर्यंत अशा प्रकारची माहिती दिली जात नाही तोपर्यंत संशयाचे हे धुके जास्तच दाट होत राहणार आहे. त्यामुळे आणखी काही नवीन प्रश्नांची निर्मिती होणार आहे. हे टाळायचे असेल तर सरकारने या कारवाईचा एक विस्तृत अहवाल संसदेमध्ये सादर करून या विषयाला पूर्णविराम देण्याचा विचार करायला हवा.- कमलेश गिरी

Check Also

व्हॉट्सअपची कोलांटउडी

व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना …