लेख-समिक्षण

पावसाचे रुपेरी रंग

हिंदी सिनेसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात आजवर शेकडो चित्रपटांत पावसाने आपल्या वाटा शोधल्याचे दिसले. प्रेम, वासना, विरह, आतुरता, क्रौर्य, प्रतिशोध आदी अनेक प्रकारच्या भावनांची पावसाशी सांगड घालून ती कथानकात बसवून आकर्षकपणाने दृश्यांमध्ये चित्रीत केली गेली. शोमन राज कपूर यांचे पावसावर विशेष प्रेम होते. त्यामुळेच की काय, ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे नर्गीससोबतचे त्यांचे पाऊसगाणे सिनेसृष्टीचे जीवनगाणे बनून गेले. जुन्या काळाच्या स्मृती जागवताना या गीताचे विस्मरण कदापि अशक्य ! सिनेसृष्टीतील जवळपास सर्वच कलाकारांनास दिग्दर्शकांना सृष्टीत चैतन्य निर्माण करणार्‍या पर्जन्यसरींना रुपेरी पडद्यावर आणण्याचा मोह आवरता आला नाही. – सोनम परब
——
आकाशातून कोसळणार्‍या, बरसणार्‍या पावसाच्या सरी या अर्थव्यवस्थेसाठी, शेतीसाठी जशा उपकारक ठरतात, तशाच त्या हिंदी सिनेसृष्टीसाठीही ! पावसाळ्यात फुलणारे प्रेम, रोमान्स, विरह, मनाची व्यथा, एकटेपणा हे सारे दाखवण्यासाठी हिंदी चित्रपटातील दिग्दर्शक आणि संगीतकारांनी वर्षानुवर्षेपावसाचा मोठ्या कल्पकतेने उपयोग केला आहे. हिंदी चित्रपटांमध्ये पाऊस अनेकदा प्रेमाचे, उत्कटतेचे आणि मनोव्यापाराचे प्रतीक म्हणून वापरला गेला आहे.
शोमॅन राज कपूर यांच्या चित्रपटात पावसाला विशेष स्थान होते. १९४९ मध्ये आलेल्या ‘बरसात’ या चित्रपटाने या परंपरेची सुरुवात केली. ‘आवारा’, ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटांमध्येही पावसाची उल्लेखनीय दृश्ये आहेत. हे गाणे आजही काळजावर कोरलेले आहे. छत्रीखाली चिंब भिजत प्रेमात आकंठ बुडालेली नरगिस आणि राज कपूर यांचे ते दृश्य हिंदी सिनेमाचा अविभाज्य भाग बनले आहे. १९५५ मध्ये आलेल्या ‘श्री ४२०’ मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ मधील पावसात भिजणारे राज कपूर आणि नर्गिस यांचे दृश्य आजही तितक्याच उत्कटतेने पाहिले जाते आणि ऐकले जाते. १९६४ मध्ये आलेल्या ‘लग जा गले वो कौन थी’ मधील पावसातली भावना ही विरहाची, तात्पुरत्या भेटीची आणि अपरिहार्य अलिप्ततेची जाणीव करून देते.
‘बरसात की एक रात’ या चित्रपटात भारत भूषण आणि मधुबाला यांची पहिली भेट पावसाच्या पार्श्वभूमीवर घडते. अनेक चित्रपटांत नायक एका बस स्टॉपवर, पावसात चिंब भिजणार्‍या नायिकेला पाहून तिच्या प्रेमात पडतो. काही वेळा तर पावसामुळे एकाच छत्रीखाली अडकलेले नायक-नायिका, आधी कट्टर शत्रू असूनही प्रेमात पडतात.
१९९१ मध्ये आलेल्या ‘हिना’ या चित्रपटातसुद्धा कथानकाचा कलच पावसामुळे बदलतो. नायक ऋषी कपूर जोरदार पावसामुळे आपल्या होणार्‍या पत्नीकडे न जाता, पाकिस्तानात हरवून हिनाशी (जेबा बख्तियार) एक नवा संबंध प्रस्थापित करतो.
प्रेमसंबंध दाखवताना पावसाचा वापर हा आजवर अनेक हिट गाण्यांचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. ‘चलती का नाम गाडी’ (१९५८) मधील ‘एक लड़की भीगी भागी सी’ मधुबालावर चित्रित झालेले असून किशोर कुमारच्या हलयाफुलया अभिनयाने सजलेले आहे. ‘आराधना’ (१९६९) मधील ‘रूप तेरा मस्ताना’ या गीतातीतल पावसाळी रात्रीचे आणि प्रणयाचा परमोच्च क्षण दाखवणारे प्रसंग आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
चित्रपटांत पावसाच्या साक्षीने प्रेमाचा उत्कट आविष्कार सतत घडत गेला आहे. प्रेमी-प्रेमिका झाडांच्या आड, छत्रीखाली, ओल्या रस्त्यांवर, किंवा पावसात भिजताना गाणी गाताना दिसतात. ‘जैसे को तैसा’ (१९७३) मधील ‘अब के सावन में जी डरे’ किंवा ‘रोटी, कपड़ा और मकान’ (१९७४) मधील ‘हाय हाय ये मजबूरी’ या गाण्यांमधून पावसामुळे निर्माण होणारी आगतिकता, प्रेम आणि आर्तता दाखवली गेली आहे. २००७ मधील ‘लाइफ इन ए मेट्रो’ मध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर नव्याने प्रेम फुलताना दाखवले गेले आहे.
पावसाचा वापर केवळ प्रणयासाठी न होता, दुःखद किंवा थरारक प्रसंगांमध्येही प्रभावीपणे केला जातो. ‘चांदनी’ (१९८९) मध्ये विनोद खन्ना आपल्या मृत पत्नीच्या आठवणींत भिजतो. ‘मशाल’ (१९८४) मध्ये दिलीप कुमार पावसात पत्नीसाठी मदतीची याचना करतात. ‘कंपनी’ (२००२) व ‘जॉनी गद्दार’ (२००७) या गुन्हेगारीपटांमध्ये खून आणि संघर्षाची दृश्ये अधिक रौद्र वाटावीत, यासाठी पावसाचा उपयोग केला गेला आहे.
काही वेळा पावसाचा उपयोग विखारी आणि भीषण दृश्यांसाठीही केला जातो. ‘अर्जुन’ (१९८५) मध्ये छत्र्यांच्या गर्दीतील मारहाणीचे दृश्य भेदक प्रभाव टाकते. ‘अज रपट जाए तो हमें ना उठइयो’ (नमक हलाल) सारख्या हलयाफुलया गाण्यातही पावसाचा आनंद व्यक्त केला जातो.
‘दो बीघा जमीन’ सारख्या सामाजिक सत्याला अधोरेखित करणार्‍या चित्रपटातही पावसाच्या सरीतील ‘आयो रे आयो रे सावन आयो रे’ या गीतपंक्ती मानवातील जीवनशक्तीचे प्रतीक ठरतात.काही चित्रपटांत पावसामुळेच कथानक निर्णायक वळण घेते. ‘लगान’ (२००१) मध्ये पावसाअभावी शेतकरी लगान भरू शकत नाहीत आणि त्यामुळे नायक भुवन इंग्रजांविरुद्ध बंड पुकारतो. ‘गाइड’ (१९६५) मध्येही सुकलेल्या गावात संताकडून पावसाची याचना केली जाते. तर ‘वो कौन थी’ (१९६४) मध्ये ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम‘ हे गीत संपूर्ण रहस्याचा भाग बनते.
पावसावर आधारित शीर्षके
‘बरसात’ (१९४९) हा राज कपूरचा चित्रपट पावसाला केंद्रस्थानी ठेवून तयार केला गेला. त्यानंतर बॉबी देओलच्या दोन ‘बरसात’ (१९९५, २००५) नावाच्या चित्रपटांनी हे शीर्षक कायम ठेवलं. ‘बरसात की रात’ (१९६०), ‘बरसात की एक रात’ (१९८१), ‘सावन को आने दो’, ‘सावन भादों’, ‘प्यासा सावन’ ही शीर्षके पावसाने केवळ गाण्यांपुरतेच नव्हे तर चित्रपटांच्या शीर्षकांपर्यंत आपले अस्तित्व निर्माण केले आहे, हे सांगून जातात. पावसाचा नादमधुर आवाज व्यक्त करणारी ‘टिप टिप बरसा पानी’, ‘डम डम डीगा डीगा’, ‘बादल यूं गरजता है’ यांसारखी गीते आपल्याला एक विशिष्ट भावविश्वात घेऊन जातात. त्यात प्रेम आहे, विरह आहे आणि जीवनाचं संगीतही आहे.
एकूणच, जीवसृष्टीसाठी संजीवनी असणारा पाऊस हा हिंदी सिनेसृष्टीलाही आधार देणारा ठरला. हिंदी चित्रपटांमध्ये कधी तो प्रेमप्रसंगात सौंदर्य खुलवतो, कधी तो लायमॅसला नाट्यमय उंचीवर नेतो, कधी पात्रांचे जीवनच बदलतो, तर कधी कहाणीत दुःख किंवा थराराची छटा भरतो. आजही जेव्हा पावसाळा सुरु होतो, तेव्हा आपल्या मनात प्यार हुआ इकरार हुआ किंवा घनन घनन हे गीत नकळत रुंजी घालू लागतं.

Check Also

विमान अपघातांचे रुपेरी चित्रण

अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. …