ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे प्रत्येक दहा पुरुषांपैकी एक पुरुष आपल्या बाळाच्या जन्माच्या आधी किंवा नंतर चिंता व नैराश्यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा अनुभव घेतो. भावनिक चढउतार आणि शारीरिक थकव्यासोबतच, नव्याने वडील बनलेल्या पुरुषांना अनेक प्रत्यक्ष अडचणींचा सामना करावा लागतो. बाळाची निगा राखणे, पत्नीला मदत करणे आणि आर्थिक जबाबदारी पार पाडणे यांबरोबरच घराची जबाबदारी त्याच्यावर असते. अशा परिस्थितीत वडील होणे हे मानसिक ताण वाढवणारे ठरू शकते, हे आश्चर्यकारक नाही. पण चिंताजनक बाब ही आहे की, बरेच पुरुष यासाठी कोणतीही मदत घेत नाहीत. काही संशोधनांतून असेही आढळले आहे की वडिलांचे मानसिक आरोग्य त्यांच्या मुलांच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन विकासावर परिणाम करू शकते.
गरोदरपणाच्या काळात आणि बाळाच्या जन्मानंतर अनुभवास येणार्या वडिलांमधील मानसिक ताणाचा त्यांच्या मुलांच्या सामाजिक, भावनिक, बौद्धिक, भाषिक आणि शारीरिक विकासावर जन्मापासून ते किशोरवयाच्या सुरुवातीपर्यंत नकारात्मक परिणाम होतो.
दुसरीकडे, ही वेळ अशी असते जेव्हा त्यांना सर्वाधिक मदतीची गरज असते. कुटुंबासाठी बळकट राहणे आवश्यक आहे, यासाठी आपल्या भावनांवर मात केली पाहिजे, ही जाणीव पुरुषांमध्ये असूनही परिस्थिती तशी नसल्याने त्यांच्या मनावर ताण येतो. पण तो मागे सारुन अधिक कामात स्वतःला गुंतवणे किंवा मद्यपान किंवा व्यसन यांसारख्या मार्गांनी ते समस्यांपासून पळ काढतात.
कामाचे तास हाही एक मोठा अडथळा असतो. आज महानगरांमधील तरुणपिढी पाहिल्यास ३०-३५ वयोगटात त्यांचे विवाह होतात आणि विभक्तपणे ते शहरात वा उपनगरात फ्लॅट घेऊन राहतात. मुलाच्या जन्मानंतर एक तर सासर-माहेरची कोणी तरी एक व्यक्ती सुरुवातीच्या काळात बोलावली जाते. पण एरवी मेड, आया यांची नेमणूक केली जाते. पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही. अशांची संख्या मोठी आहे. या नवतरुण पुरुषपित्यांनी काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.
श्र सर्वांत पहिली गोष्ट मूल जन्माला घालण्याआधीच सर्व बाबींचा विचार करणे गरजेच असते. समजा आपण केलेल्या विचाराच्या विरुद्ध परिस्थिती उद्भवली तरी तिचा शांतपणाने स्वीकार करा.
श्र या काळात वडिलांचा शांतपणा हा मुलाच्या संपूर्ण आयुष्यासाठी महत्त्वाचा असतो. याउलट वडील अशांत असतील, चिडचिड करणारे असतील तर त्यातून मुलांच्या मनावर अत्यंत नकारात्मक परिणाम होतो. हे टाळण्यासाठी दररोज कामाचे चोख नियोजन करा. यामध्ये ध्यानधारणा, व्यायाम, योगासने यांचा समावेश करा.
श्र पत्नी आणि मूल या दोघांनाही समान न्याय द्या. कोणत्याही परिस्थितीत मुलावर किंवा पत्नीवर ओरडू नका.
या काळासाठी आधीपासूनच अतिरिक्त आर्थिक तरतूद करा. ती नसेल तर वडील होण्याचा निर्णय थोडा पुढे ढकला. पण आजच्या महागाईच्या काळात आणि सोशल मीडियामुळे वाढलेल्या अपेक्षांच्या काळात तुम्हाला मुलाला चांगले आयुष्य द्यायचे असेल तर वडील म्हणून तुमच्याकडे आर्थिक तरतूद असलीच पाहिजे. तेव्हा नवनोकरदार असाल तर आत्तापासूनच बाप बनण्याची तजवीज करा.
Check Also
टोनिंग का गरजेचे?
स्वच्छ, निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी लेन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही तीन महत्त्वाची पावले आहेत. …