लेख-समिक्षण

निसर्गबदलांपुढे तंत्रज्ञान थिटे

जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणार्‍या हवामान बदलांच्या झळांनी आज मानवी जीवनापुढे केवळ संकटांची मालिकाच उभी राहिलेली नाहीये, तर मनुष्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषतः भारतासारख्या देशात मान्सूनच्या चक्रावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झालेला दिसत आहे. अलीकडेच चक्रीवादळांचे अचूक भाकीत करणारे ‘सायलोन मॅन’ डॉ. मृत्युञ्जय महापात्र हवामानातील बदलर टिपण्यास आधुनिक प्रणालाही अपुरी ठरत असल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानात यथावकाश प्रगती होत जाईलही; पण ते रोगनिदान झाले; रोगावरचे उत्तर किंवा प्रतिबंधात्मक उपाय नाहीत. त्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली आणि निसर्गसंवर्धन गरजेचे आहे. वेळ कमी आहे.

चक्रीवादळांचे अचूक भाकीत करणारे ‘सायलोन मॅन’ डॉ. मृत्युञ्जय महापात्र यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा आपत्ती धोका कमी करणारा पुरस्कार २०२५ मिळाला आहे. अमेरिकन हवामान संस्थेकडूनही त्यांना ’आउटस्टँडिंग सर्व्हिस अवॉर्ड २०२५’ देण्यात आला आहे. तोट्याचा धोका कमी करणार्‍या हवामान अंदाज यंत्रणेच्या सुधारणेसाठी त्यांनी आयएमडीमध्ये ३० वर्षांपेक्षा अधिक सेवा दिली आहे. ते जागतिक हवामान संघटनेचे तिसरे उपाध्यक्ष आहेत. अशी व्यक्ती जेव्हा हवामानातील बदल टिपण्यास आधुनिक प्रणालाही अपुरी ठरत आहे, असे म्हणते तेव्हा गांभीर्याची पातळी किती मोठी आहे हे लक्षात येते.
——-
भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीची सध्या समाजमाध्यमांत चर्चा आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी पारंपरिक संगणकीय मॉडेल्स आणि आकडेवारीवर आधारित गणितीय प्रणाली आता हवामानातील क्षणाक्षणाला होणारे बदल पकडू शकत नाहीये, अशी स्पष्टपणाने कबुली देताना स्थानिक पातळीवर अचानक येणार्‍या तीव्र हवामानाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पारंपरिक हवामान पद्धतींची अचूकता कमी होत असून पूर्वीप्रमाणे सहजतेने वेळेपूर्वी अंदाज वर्तवणे आव्हानात्मक ठरत असल्याचे मान्य केले आहे. याच मुलाखतीमध्ये त्यांनी स्थानिक पातळीवर अचानक होणारी ढघफुटी, काही तासांत होणारी अतिवृष्टी, गारपीट, उष्णतेच्या लाटा यांसारख्या घटनांमध्ये होणार्‍या वाढीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच या आव्हानांना तोंड देण्यासाठी हवामान विभाग आपल्या क्षमता वाढवत असल्याचेही त्यांनी सांगितले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजांकडे गांभीर्याने पाहणार्‍या सर्वसामान्यांच्या दृष्टीने त्यांनी विषद केलेली माहिती ही उद्बोधक आहे. कारण बरेचदा सामान्य नागरीक ढगफुटी, अतिवृष्टीसारख्या घटनांनंतर हवामान विभागावर दोषारोप करुन टीकेचा भडीमार करत असतात. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, हे बदल पराकोटीला पोहोचल्याने त्यांचा अदमास घेण्यास तंत्रज्ञानही थिटे पडत आहे.
पूर्वीचा कालखंड आठवून पहा पावसाळ्यात एखाद-दुसरी ढगफुटीची घटना तीही ईशान्येकडी राज्यांत, हिमालयीन प्रदेशात झाल्याचे ऐकायला मिळायचे. ढगफुटी म्हणजे अल्पावधीत एका निश्चित भागात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद. २०२३-२४ मध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रातील कोकण भाग, तसेच सिक्कीम व जम्मू-काश्मीरमध्ये १५० पेक्षा अधिक ढगफुटीच्या घटना नोंदविल्या गेल्या. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, २००० पूर्वी अशा घटना वर्षाला १०-१२ असत, परंतु सध्या त्यांची संख्या ५० च्या वर गेली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश ढगफुटींविषयी हवामान खात्याला आकलन झालेले नव्हते.
समुद्राच्या तापमानात ०.५ अंश सेल्सियस इतकी वाढ देखील वादळी ढग तयार करण्यास पुरेशी ठरते. यामुळे अंदाज जरी दिला गेला, तरी त्याच्या अंमलबजावणीत त्रुटी राहतात. वातावरणात वाढलेली आर्द्रता ढग तयार होण्यासाठी पोषक ठरते, मात्र ती नियंत्रित नसल्यास ढगफुटीला कारणीभूत होते. जागतिक तापमानवाढीत भारताचा सहभाग सुमारे ७ टक्के असून, शहरांमध्ये हिट आयलंड इफेटमुळे लोकल हवामानात तीव्र फरक पडतो.
सामान्यतः जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सुमारे ७५ टक्के पावसाचे प्रमाण नोंदवले जाते. २०२३ मध्ये मान्सूनची सुरुवात उशिरा झाली, नंतर काही आठवडे तीव्र पाऊस, मग पुन्हा कोरडा काळ, नंतर अचानक ऑटोबरमध्ये अतिवृष्टी ‡असे मान्नूसचे चक्र राहिल्यामुळे शेती, जलसंपत्ती व उपजीविकेवर परिणाम झाला. यंदाच्या वर्षी तर ऐन वैशाखात मान्सूनचे आगमन होऊन अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. सुरुवातीचे काही दिवस हवामान खात्याला हा पूर्वमान्सूनचा पाऊस आहे की अवकाळी आहे याचे आकलन झाले नव्हते. भारतात २०२४ मध्ये नोंदवलेल्या एकूण १६४ हवामान संबंधित आपत्तींपैकी केवळ ४३ टक्के घटनांचा योग्य अंदाज वेळेवर दिला गेला. २०२२-२४ दरम्यान सुमारे ३५ लाख हेटर जमीन सतत बदलत्या हवामानामुळे नुकसानग्रस्त झाली.
गेल्या दहा वर्षांमध्ये भारतामध्ये हवामानाचे चक्र इतके विपरीत झाले आहे की प्रगत-अत्याधुनिक बनलेल्या हवामान विभागालाही त्याचे आकलन होईनासे झाले आहे. पूर्वी मान्सूनचा आगमनाचा कालावधी १ जून (केरळ) पासून सुरुवात होऊन ऑगस्टच्या मध्यापर्यंत देशभर वितरित होत असे. मात्र आता अचानक मुसळधार पाऊस, ढगफुटी, चक्रीवादळे किंवा महिनाभर कोरडे हवामान या घटना नेहमीच्या झाल्या आहेत.
मान्सूनवर हवामान बदलांचा सर्वांत मोठा झालेला परिणाम म्हणजे त्याचा वाढलेला लहरीपणा. विशेषतः कमी काळात जास्त पाऊस पडणे हे सध्या मान्सूनचे ठळक वैशिष्ट्य बनले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नागपूर, मुंबईसह अनेक शहरांना याचा तीव्र फटका बसला आहे. २६ जुलै २०२५ मध्ये मुंबईत झालेल्या जलप्रलयाच्या दिवशी १२ तासांत ९५० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला होता. अशा प्रकारच्या ढगफुटीच्या घटना आता पावसाळ्यात नित्याच्या झाल्या आहेत. तसेच मान्सूनचे दिवस कमी होत चालले आहेत. पूर्वी पावसाचे दिवस १०० होते, ते आता ५० वर आले आहेत. समुद्र तापमानात झालेले तीव्र बदल, मान्सूनमधील अनिश्चितता आणि नागरी नियोजनातील त्रुटींमुळे अलीकडील काळात गंभीर संकटे उभी राहात आहेत. या संकटांचा सामना करताना कृत्रिम बुद्धीमत्ता, परम संगणक यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत, १०० हून अधिक स्टार्टअप्सच्या साहाय्याने, ‘मिशन मौसम’ अंतर्गत जोडल्या गेलेल्या संस्थांकडून मिळणार्‍या डेटाच्या आधारे भारतीय हवामान विभाग अधिकाधिक अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये बर्‍याच प्रमाणात यशही येत आहे; पण रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार करायचे झाल्यास निसर्ग सर्वशक्तीमान आहे हे स्वीकारुन पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारून, वायूप्रदुषण कमी करुन, वृक्ष-जंगलांची लागवड गतिमानतेने करुन पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारणे गरजेचे आहे. कारण शेवटी, निसर्ग सर्वशक्तीमान आहे. हवामान महासंचालकांच्या म्हणण्याचा हाच गाभा आहे. -रंगनाथ कोकणे,पर्यावरण अभ्यासक

Check Also

श्रीमंतीदर्शनाचा हुकमी एक्का

माणूस इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळा असला तरी मानवीसमूहांमध्येही मी वेगळा आहे, खास आहे हे दाखवण्याची मानसिकता …