लेख-समिक्षण

देण-घेणं

कोंबडी आधी की अंडं आधी, हे कोडं एकवेळ सुटू शकेल; पण सरकारी योजना आधी की ती अयशस्वी करण्याची वृत्ती आधी, हे कोडं सुटणार नाही. तसं बघायला गेलं, तर जगात ‘फ्री’ म्हणून दिली जाणारी गोष्टही कधी फुकट मिळत नसते. मग ती कंपन्यांची स्कीम असो वा सरकारी अनुदान असो. अमक्या वस्तूबरोबर तमकी वस्तू मोफत, अशी कितीही जाहिरातबाजी केली तरी दोन्ही वस्तू हातोहात खपवण्याची ती युक्ती असते. कल्याणकारी अर्थव्यवस्थेत लोकांना फुकट दिल्या जाणार्‍या वस्तू, अनुदानं वगैरे कसं घोर पातक आहे, हे पटवून देणारे युक्तिवाद मध्यंतरीच्या काळात मोठ्या हिरीरीनं केले गेले. दुसर्‍या बाजूला ‘सरकार एका खिशातून दहा रुपये काढून घेतं तेव्हा दुसर्‍या खिशात एक रुपया टाकतं,’ हेही पटवून दिलं गेलं. मग ‘रेवडी’ वगैरे शब्द चर्चेत आला. तो एकटा आला नाही, तर कुणी दिल्यास तिला ‘रेवडी’ म्हणावं, याची अजब नियमावली सोबत घेऊन आला. आपण दिलं तर ‘सत्पात्री दान’ आणि दुसर्‍या कुणी दिलं तर ‘रेवडी’ ही भाषा सगळेच राजकीय पक्ष करू लागले. लोकांचे प्रश्न काय आहेत याच्याशी कुणालाच देणं-घेणं नसतं, कारण ‘देणं’ वाढलं की ‘घेणं’ आपोआप वाढतं. बर्‍याचदा देणारे आणि घेणारे वेगवेगळे असतात आणि दुखावलेले करदाते स्मार्टफोनची चौकट न मोडता राग वगैरे व्यक्त करत राहतात.
देण्या-घेण्यातलं अंतर खूपच कमी करणारा प्रकार कर्नाटकात नुकताच उघड झाला. फोटोशूटपुरतं देणं आणि नंतर काढून घेणं, अशी ही घटना व्हिडिओत चित्रित झाली आणि खळबळ उडाली. अंगणवाडीतल्या मुलांना पौष्टिक म्हणून अंडी देण्याची योजना कर्नाटक सरकारने सुरू केली. त्यासाठी कॉर्पोरेट-संलग्न संस्थेशी करार केला. जी मुलं अंडी खात नाहीत, त्यांना पर्यायी पौष्टिक सप्लिमेन्ट द्यायची, असं ठरलं. मुलांच्या ताटात अंडी आली. त्याचं फोटोशूट झालं. परंतु कॅमेरा बंद होताच अंगणवाडी सेविकेनं मुलांच्या ताटातली अंडी पुन्हा काढून घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर ही अंडी कुठे गेली, हे कुणालाच समजलं नाही. हा प्रकार स्थानिक पातळीवर सुरू असावा, की सरसकट त्याची साखळी असावी, असा प्रश्न ज्यांना पडायचा त्यांना पडला. परंतु ‘पकडा गया वो चोर’ या न्यायानं दोन अंगणवाडी सेविकांना पदमुक्त करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. योजनेनुसार, पहिली ते दहावीपर्यंतच्या सुमारे 55 लाख मुलांना या योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित आहे. प्रथिनांपासून खनिजांपर्यंत सर्व पोषक घटक अंड्यांमध्ये असल्यामुळं सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात अंडी आली.
कोप्पल जिल्ह्यातल्या एका अंगणवाडीत मात्र सरकारी चित्रीकरणानंतरही कुणाचातरी कॅमेरा सुरू राहिला. त्यातल्या चित्रीकरणात वेगळीच स्टोरी दिसते. प्रथम मुलांच्या ताटात अंडी वाढल्याचं दिसतं. नंतर मुलांना प्रार्थना म्हणायला सांगितलं जातं. प्रार्थनेनंतर अंगणवाडी सेविका मुलांच्या ताटातली अंडी काढून घेताना दिसते. अंड्यातले ‘पोषक घटक’ कुठे जातात आणि नेमकं कुणाचं ‘पोषण’ करतात, हे गुप्त चित्रीकरणातून समोर आलेलं नसलं, तरी ‘तोंडचा घास हिरावून घेणं’ या म्हणीचा वाक्यात केलेला उपयोग मात्र मुलांच्या हिरमुसलेल्या चेहर्‍यांवर स्पष्ट दिसतो.-हिमांशू चौधरी

Check Also

जा एकदाची..!

जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *