भोपाळ येथील एका आरोपीने ‘भारतमाता की जय’ म्हणत तिरंग्याला 21 वेळा वंदन केले आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावली होती. या आरोपीने पाकिस्तान समर्थनपर घोषणा दिल्या होत्या. हा आरोपी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मंगळवारी पोलिस ठाण्यात हजर होऊन ‘भारतमाता की जय’ म्हणाला. त्याने तिरंग्याला 21 वेळा वंदन केले. विशेष म्हणजे जामिनावर मुक्तता मिळण्यासाठी या अटीचे पालन केल्यानंतर त्याला शहाणपणही सुचले आहे. ‘रील तयार करणे आणि अशा (पाकिस्तान समर्थनपर) घोषणा देणे ही मोठी चूक होती आणि त्याबद्दल मला खेद आहे,’ अशी कबुली त्याने प्रसारमाध्यमांसमोर दिली. तसेच, ‘कोणीही राष्ट्रविरोधी कृत्य करू नये,’ असे सांगत ‘अशा रील्स बनवू नका,’ असे आवाहनही त्याच्या मित्रांना केले.
गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने या प्रकरणातील फैझान या आरोपीला प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या मंगळवारी मिसरोड पोलिस ठाण्यात हजर राहून ‘भारतमाता की जय’ म्हणत तिरंग्याला 21वेळा वंदन करण्याचे निर्देश दिले होते. ‘उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत फैझान महिन्याच्या चौथ्या मंगळवारी पोलिस ठाण्यात आला आणि त्याने तिरंग्याला 21वेळा वंदन केले. त्याच्या या कृतीचे प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत चित्रिकरण करण्यात आले, अशी माहिती मिसरोड पोलिस ठाण्याचे प्रभारी मनीष राज भदोरिया यांनी दिली. आदेश पालनाचा हा अहवाल उच्च न्यायालयात पाठवला जाणार असून आरोपीवरील खटला संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचवणारे विधान केल्याप्रकरणी आरोपी फैजल उर्फ फैझान याच्या विरोधात भोपाळच्या मिसरोड पोलिस ठाण्यात मे महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशात उच्च न्यायालयाने पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देणार्या या व्यक्तीला काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्याने एका महिन्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यात यावे आणि दर मंगळवारी 21 वेळा राष्ट्रध्वजाला वंदन करावे, जर त्याने असे केले तरच त्याला जामीन दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने सांगितले की, आरोपीने दर महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान न्यायालयाने दिलेल्या अटींचे पालन करावे लागेल. याशिवाय आरोपींवर 50 हजार रुपयांचा जातमुचलक भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मध्य प्रदेशातील उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती दिनेश कुमार पालीवाल यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. फैजानला कलम 153 अंतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतले असून नंतर आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगत त्याने कोर्टाकडे जामीन मागितला. तथापि, फिर्यादीने व्हिडिओ दाखवल्याने आरोपीचे कृत्य पकडण्यात आले. एका व्हिडीओमध्ये तो पाकिस्तान समर्थन घोषणा देताना दिसत होता. ‘अर्जदाराची काही अटींवरच जामिनावर मुक्तता केली जाऊ शकते, जेणेकरून तो ज्या देशामध्ये जन्मला आणि जीवन जगतोय, त्या देशाप्रति जबाबदारी आणि अभिमानाची भावना निर्माण होईल,’ असे न्या. डी. के पालिवाल यांनी आरोपीला जामीन देताना दिलेल्या आदेशात नमूद केले होते. आरोपीने पाकिस्तानसमर्थक नारे दिल्यामुळे दोन भिन्न गटांमधील शत्रुत्वाला खतपाणी घातले गेले, तसेच, त्याचे कृत्य सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचवणारे होते, असे त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
Check Also
तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …