डॉ. विक्रम साराभाई हे भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इथेच झाले. गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांमध्ये विशेष आवड असणार्या साराभाईंनी पुढील शिक्षणासाठी 1937 मध्ये ब्रिटन गाठले, मात्र त्याचवेळी दुसरे महायुद्ध ऐन भरात होते. त्यामुळे तिथून ते पुन्हा मायदेशी परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये संशोधनास सुरुवात केली. 1947 मध्ये दुसरे महायुद्ध संपले आणि ते पुन्हा ब्रिटनमध्ये गेले. तिथे त्यांनी कॉस्मिक रे इनव्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युड्स या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. ब्रिटनमधून परतल्यानंतर त्यांनी 11 नोव्हेंबर 1947 रोजी फिझिकल रिसर्च लॅबची स्थापना केली.
अहमदाबाद येथील महात्मा गांधी विज्ञान प्रयोगशाळेतील घटना आहे. त्या वेळी तेथील प्रमुख विक्रम साराभाई होते. साराभाई आपल्या विद्यार्थ्यांना मन लावून व निष्ठेने शिकवत असत. विद्यार्थ्यांना कधी काही अडचण आली तर साराभाई आपले कामकाज सोडून त्यांना वेळ देत असत. एके दिवशी दोन विद्यार्थी प्रयोगशाळेत एक प्रयोग करीत होते. साराभाईंनी त्यांना सर्व मार्गदर्शन केलेले होते. त्यानंतरही त्यांच्या एका चुकीने अचानक जास्त विद्युतप्रवाह सुरू झाला आणि एक यंत्र जळाले. बाजारातही ते यंत्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेक प्रयोग करायचे राहिले होते. दोन्ही विद्यार्थी घाबरले. तेवढ्यात साराभाई आले. एका विद्यार्थ्याने दुस-याला हळूच म्हटले, तू त्यांना ही घटना सांग, मला भीती वाटत आहे. दुस-यानेही भीतीमुळे नकार दिला. साराभाईंनी कुजबुज ऐकून विचारले, तेव्हा विद्यार्थ्याने खरे सांगितले. तेव्हा साराभाई ना क्रोधित झाले ना त्यांच्या चेह-यावर तणाव जाणवला. ते सहज म्हणाले, ‘एवढीशी गोष्ट आहे. तुम्ही चिंता करू नका. फक्त भविष्यात काळजी घ्या.’ हे ऐकून विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी आदर वाटू लागला.
शिकणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. ती प्रयोग व चुकीनेच साकारते. खरा गुरू शिष्यांना चूक झाल्यावरही प्रोत्साहन देत असतो. कारण ते सुधारणेच्या मार्गावर पुढे जात आपले ध्येय प्राप्त करतात ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
एका सिएची यशोकहाणी
भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …