आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचा जन्म डॉ. एस. स्वामीनाथन व अम्मू या दाम्पत्यापोटी 24 ऑक्टोबर 1914 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील होते. आई काँग्रेसच्या एक आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. 1928 मध्ये लक्ष्मी आईबरोबर कोलकाता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या. अधिवेशनावेळी सुभाषचंद्र बोस यांनी दोनशे स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन सादर केले होते. या संचलनाचा लक्ष्मी यांच्यावर प्रभाव पडला.
वर्ष 1930 मधील सविनय कायदेभंगाच्या चळवळीत लक्ष्मी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना अटक झाली होती. मात्र शाळा, महाविद्यालय यांवर बहिष्कार घालण्याची कृती त्यांना अमान्य होती. देशाच्या स्वातंत्र्याकरिता शिक्षण आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांचा बी. के. एन. राव या वैमानिकाशी परिचय होऊन त्याची परिणती विवाहात झाली. तथापि, रावांशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर त्या विभक्त झाल्या. 1938 मध्ये त्या मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाल्या. तसेच 1939 मध्ये स्त्रीरोग चिकित्सा व प्रसूतिशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर लक्ष्मी यांनी चेन्नईच्या कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयात अल्पकाळ नोकरी केली. 1940 मध्ये त्या सिंगापूरला गेल्या. तेथे भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना उघडला.
सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी, अशी इच्छा व्यक्त केली. या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या. शिवाय त्यांच्याबरोबर अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले. सुभाषबाबू यांनी सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले. त्यानंतर 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली व लक्ष्मींना महिला व बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले. जपानी सैनिकांच्या मार्गदर्शनाखाली रायफल चालविण्याबरोबरच हातबॉम्ब आणि गनिमीकाव्याच्या व्यूहरचना आत्मसात करून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले. वर्ष 1945 मध्ये अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला आणि जपानने शरणागती पत्करली, तेव्हा आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. युद्धविरामापर्यंत कॅप्टन लक्ष्मींना पदोन्नती मिळून त्या लेफ्टनंट कर्नल झाल्या होत्या.
Check Also
एका सिएची यशोकहाणी
भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …