यश मिळविण्यासाठी माणूस जंगजंग पछाडत असतो. अगदी ओठापर्यंत आलेला घास हिरावला जातो तेव्हा तो निराश होणे साहजिक आहे. अशा वेळी त्याला यश हे पा-यासारखे आहे असे वाटत असते. अनेकवेळा अंतिम रेषेपर्यंत मजल मारूनही अंतिम रेषा ओलांडणे जमत नाही तेव्हा ‘चोकर्स’चा शिक्का बसतो. चोकर्स म्हणजे ऐनवेळी हातपाय गाळणे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने हा अनुभव अनेकवेळा घेतला आहे. सुमारे तीन दशके ‘चोकर्स’ची नामुष्की सहन केली आहे. परंतु अखेर शनिवार, १४ जून रोजी क्रिकेटची मक्का मानल्या जाणा-या लॉर्डस्च्या मैदानावर टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकेच्या संघावर दैव मेहरबान झाले. आतापर्यंत अनेक वेळा जगज्जेतेपदाने हुलकावणी दिल्यामुळे द. आफ्रिकेच्या संघावर ‘चोकर्स’चा शिक्का बसला होता. महत्त्वाच्या क्षणी नांगी टाकत त्यांनी त्याला खतपाणीही घातले होते. पण ऑस्ट्रेलियाला पाच विकेटस् राखून पाणी पाजत द. आफ्रिकेने आयसीसी कसोटी जगज्जेतेपद पटकावले अन् ‘चोकर्स’चा शिक्काही पुसून टाकला. २७ वर्षांनंतर आयसीसीचे जेतेपद पटकावण्याची करामत बवुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकेच्या संघाने केली. आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. द. आफ्रिकेने अंतिम सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा ५ गडी राखून पराभव केला. जागतिक कसोटी अजिंयपद स्पर्धा २०२५ चे जेतेपद मिळवल्याबद्दल आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी मानाची गदा (टेस्ट मेसा) द. आफ्रिकेच्या संघाला बहाल केली. जणूकाही ‘हम भी कुछ कम नही’चा इशारा या संघाने क्रिकेटविश्वाला दिला. आफ्रिकेचे हे दुसरे आयसीसी जेतेपद. याआधी त्यांनी १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर बहुतांश आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांना उपान्त्य अथवा अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आयसीसीने २०१९ पासून कसोटीसाठीही जागतिक स्पर्धा सुरू केली. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही स्पर्धा खेळवण्यात येते. यामध्ये प्रत्येक संघ घरच्या मैदानात ३ तर परदेशात ३ कसोटी मालिका खेळतो. साखळी फेरीच्या अखेरीस टक्केवारीनुसार गुणतालिकेतील पहिल्या दोन क्रमांकाचे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. कांगारूंनी आजवर एकाही आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावलेला नव्हता, त्यालाही यंदा छेद मिळाला. आजवरच्या तीन कसोटी अजिंयपद स्पर्धेत प्रत्येकवेळी नवा विजेता उदयास आला आहे. २०२१ मध्ये न्यूझिलंड, २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया तर २०२५ मध्ये द. आफ्रिका विजेता ठरला. २०२५ हे वर्ष अनेक क्रीडा प्रकारांत नवविजेत्यांचे वर्ष ठरले आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत पॅरिस सेंट जर्मेन संघाने जेतेपद मिळवले. बिग बॅश लीगमध्ये होबार्ट संघाने १३ वर्षांनंतर प्रथमच जेतेपद मिळवले. स्पेनचा अल्काराझ पॅरिसमधील ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत लाल मातीचा बादशहा ठरला. पहिले दोन सेट गमावूनही त्याने नंतरचे तिन्ही सेट जिंकले. एकंदरीत २०२५ हे वर्ष नवविजेत्यांचे वर्ष ठरले आहे. — नितीन कुलकर्णी
Check Also
व्हॉट्सअपची कोलांटउडी
व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना …