इंग्लंडविरुध्दच्या दुसर्या कसोटी सामन्यात भारताच्या शुभमन गिलने ऐतिहासिक झंझावात करीत २६९ धावांचा विक्रम नोंदविला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याने एक नवीन सोनेरी पान लिहून ठेवले. २६९ धावांची त्याची ही चमकदार खेळी केवळ वैयक्तिक कामगिरी नव्हे तर संपूर्ण संघासाठी प्रेरणास्थान आहे. गिलने धावांचा डोंगर उभा करताना अनेक दिग्गज फलंदाजांचे रेकॉर्ड मोडीत काढले. या खेळात त्याने सचिन तेंडुलकरची इंग्लंडविरुध्द कसोटीतली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या पार केली. तेंडुलकरच्या नावावर २४१ धावांची नोंद होती. एका डावातील सर्वाधिक चौकारांच्या यादीतही गिल पुढे आहे. झंझावाती स्ट्राइक रेट असूनही गिलने कसोटीतील संयम, तंत्र आणि आक्रमतेचे प्रदर्शन घडविले. गिलने वन डे सामन्यातही अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. २०२३ मध्ये त्याने वन डेमध्ये दुहेरी शतक ठोकले होते. न्यूझीलंडविरुध्द २०८ धावा करताना तो वन डेमध्ये सर्वात कमी वयात डबल सेंच्युरी करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याचवर्षी त्याने चौदाशेहून अधिक धावा करुन एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा वन डे फलंदाज ही पताका फडकवली आहे. गिलचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची फलंदाजीतील स्थिरता आणि शैलीतील प्रगल्भता म्हणावी लागेल. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची भूमिका सकारात्मक असते. खेळपट्टीचा अंदाज घेऊन योग्य पध्दतीने तो फलंदाजी करतो. त्याच्या फलंदाजीत नव्या पिढीचा आत्मविश्वास आहे. त्याच्याकडे जुन्या पिढीतील सुसंयमित तंत्रही आहे. विराट कोहलीनंतर भारताचे फलंदाजीत नेतृत्व कोण करेल, ही शंका सर्वांना सतावत होती. पण गिलच्या या दमदार व ऐतिहासिक खेळीमुळे तो भारताचे नाव पुढे नेणार यावर क्रिकेट रसिकांचा विश्वास बसला आहे. तो केवळ एक प्रतिभावान फलंदाज नाही तर एक मानसिकदृष्ट्या परिपक्व, संघासाठी खेळणारा आणि दडपणातही संयम न सोडणारा खेळाडू आहे. गिल म्हणजे भारताच्या क्रिकेटच्या भविष्यातील फलंदाजीची मध्यवर्ती शक्ती ठरेल. आत्मविश्वास, परिश्रम आणि मैदानावरची कृती यामुळे भारतीय क्रिकेटला नवा दीपस्तंभ लाभला आहे. गिलच्या बॅटमधून अशीच झळाळती कामगिरी पुन्हा पुन्हा पाहायला मिळो अशीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. गिलची २६९ धावांची खेळी ही केवळ आकड्यांवर आधारित नव्हती, तर त्यात स्पष्ट रणनीती होती. पहिल्या पन्नास धावांपर्यंत संयमित सुरुवात करुन नंतर फिरकीपटूंवर आक्रमण आणि इंग्लंडच्या मधल्या व शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानभर त्याने शॉट्स मारले. त्याचा ऑफ स्टम्प बाहेरचा संयम, स्पीनवर पायांचा आकृष्ट वापर आणि रिव्हर्स स्वीप व स्टेप-आऊट कॅल्युलेटेड हिटस् या प्रमुख गोष्टींमुळे गिलच्या खेळीला वजन प्राप्त झाले. इंग्लंडने त्याच्यासाठी विविध प्लेसिंगस् वापरल्या, पण गिलने उद्देश ओळखून इतिहास रचला.- नितीन कुलकर्णी
Check Also
‘लालपरी’ला गरज आर्थिकदृष्ट्या सक्षमतेची
राज्यात प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार्या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. …