लेख-समिक्षण

ओपी नय्यर आणि लता मंगेशकर यांच्यात का बिनसले?

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गायक आणि संगीतकार होऊन गेले, ज्यांची गाणी अजरामर झाली. यापैकी एक नाव म्हणजे इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारे ओंकार प्रसाद नय्यर, ज्यांना ओ.पी. नय्यर म्हणून ओळखले जाते. नय्यर यांनी संगीताचे औपचारिक शिक्षण घेतले नव्हते; पण एकेकाळी आपल्या कौशल्यामुळे सर्वाधिक मानधन मिळवले. प्रत्येक गाण्यात विशिष्ट प्रकारचा ठेका देणाया नय्यर यांची वयाच्या १७ व्या वर्षी संगीतजगताशी ओळख झाली. त्यांनी शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण घेतले नव्हते, मात्र जेव्हा त्यांनी गाण्यासाठी संगीत दिले तेव्हा त्यात त्यांनी रागांचा सुंदर वापर केला. रसिकांना कधीच कळाले नाही की, त्यांनी रागांचे पद्धतशीरपणे शिक्षण घेतले नव्हते. लाहोर येथे जन्मलेल्या नय्यर यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांच्या घरच्यांनी त्यांना संगीताकडे जाण्यापासून रोखले. संगीतापासून दूर राहिल्यास अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल, असे त्यांना वाटत होते. पण नय्यर यांचे मन संगीतात रमले होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी एचएमव्हीसाठी ‘कबीर वाणी’ बांधली, पण ती रसिकांना आवडली नाही. असे असूनही, त्यांनी ‘प्रीतम आन मिलो’ हा खासगी अल्बम तयार केला, ज्यामध्ये सी.एच. आत्मा यांनी आवाज दिला. या अल्बमने नय्यर यांना संगीत आणि सिनेविश्वात एक ओळख दिली. परंतु देशाची फाळणी झाली आणि लाहोरमधील सगळे सोडून त्यांना पटियालाला यावे लागले. पटियाला येथे एक संगीत शिक्षक म्हणून त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू केला. यानंतर ते मुंबईत पोहोचले.
नय्यर यांना विकावे लागले घर
ओ. पी. नय्यर हे असे संगीतकार होते ज्यांनी हार्मोनियम, सितार, गिटार, बासरी, तबला, ढोलकी, संतूर, माउथऑर्गन आणि सॅक्सोफोन आदी वाद्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. या वाद्यांचा प्रयोग करताना ते गाण्याच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचे. हे फार कमी लोकांना माहीत आहे की, नय्यर हे होमिओपॅथी आणि ज्योतिषशास्त्रातही पारंगत होते. एकेकाळी सर्वाधिक मानधन घेणारे संगीतकार नय्यर यांना उदरनिर्वाहासाठी घर विकावे लागले. घेतलेल्या निर्णयाचा त्यांना पश्चात्ताप झाला नाही.
स्वत:च्या अटींवर काम करायचे
ओ.पी. स्वत:च्या अटींवर काम करायचे. लतादीदींसोबत वाद झाला, तेव्हा शमशाद बेगम यांनी त्यांना साथ दिली. त्यांनी गीता दत्त आणि आशा भोसले यांच्यासोबत गाणी तयार करायला सुरुवात केली. आशा यांचा आवाज त्यांच्या संगीतातील लय किंवा त्यांनी वापरलेल्या पंजाबी सुरांशी अगदी जुळून येत होता. गीता दत्त यांनीच नय्यर यांची गुरुदत्त यांच्याशी ओळख करून दिली.
लता मंगेशकर यांच्याशी असा झाला वाद
१९५२ मध्ये आलेल्या ‘आस्मान’मधील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लतादीदी वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. नाकात काही तरी समस्या झाल्याचे कारण दिले. नय्यर यांना मात्र ही गोष्ट आवडली नाही. ‘जो वेळेवर पोहोचू शकत नाही त्याला माझ्यासाठी काही महत्त्व नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. लतादीदींनी नय्यर यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. लतादीदींनाही राग आला. ‘मी असंवेदनशील व्यक्तीसाठी गाऊ शकत नाही,’ असे त्या म्हणाल्या.- राकेश माने

Check Also

विमान अपघातांचे रुपेरी चित्रण

अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. …