लेख-समिक्षण

ऑपरेशन सिंदूरचे वैशिष्ट्य

‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी कारवाईबाबत घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच माहितीच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरली आहे. या परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, हवाई दलातील अधिकारी व्योमिका सिंह आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी उपस्थित राहून जनतेसमोर अधिकृत माहिती मांडली. हे तिघेही आपापल्या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी अधिकारी असून, त्यांनी संयमित आणि स्पष्ट भाषेत ऑपरेशनच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल माहिती दिली. अशा संवेदनशील घडामोडीच्या वेळी सरकार आणि लष्कराकडून थेट संवाद साधणे हे लोकशाहीचे बलस्थान आहे. अफवांना आळा घालण्यासाठी आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी ही पत्रकार परिषद महत्त्वाची ठरली. माध्यमांनीही ही जबाबदारी लक्षात घेऊन अधिकृत सूत्रांवर आधारित आणि संवेदनशीलतेची जाण ठेवून बातम्या द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाममध्ये झालेल्या आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने पाकला एक प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे.तरीसुद्धा पाकिस्तान व दहशतवादी यांच्यावर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळेच भारताला अशा मोठ्या कारवाया कराव्या लागल्या. जगातील अनेक देश भारतासोबत उभे राहिल्याने पाकिस्तान पाठिंब्यासाठी धडपडत आहे. पाकिस्तानवर या कारवाईचा काहीच परिणाम न झाल्यास त्यांना भविष्यात आणखी मोठ्या कारवायांना सामोरे जावे लागेल. मंगळवारी रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई हल्ले केले. या कारवाईत दहशतवादी तळांचे भारी नुकसान करण्यात आले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताचे हे निर्णायक प्रत्युत्तर होते. सुरक्षा दलाने हे सर्जिकल ऑपरेशन अतिशय काळजीपूर्वक आणि अचूक नियोजनासह पार पाडले. भारताच्या या कृतीमुळे दहशतवादाविरुद्धची कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटणार यात शंका नाही. लष्कराच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. भारताच्या संरक्षण क्षमतेचा झंझावात पुन्हा एकदा जगासमोर स्पष्ट झाला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा मानसिक आणि सामरिक धक्का बसला आहे. त्यांच्या मोहिमांची दिशा भांबावली, भरकटली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची विश्वासार्हता आणखी ढासळली आहे. या घटनेने इतर देशांनाही भारताच्या सुरक्षाविषयक दृष्टिकोनाची जाणीव करून दिली आहे. आपल्या सैनिकांचे धैर्य, केंद्र सरकारचे ठाम नेतृत्व आणि जनतेचा लष्करावर असलेला विश्वास हे सारे घटक ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे खरे शिल्पकार आहेत. भारत शांतताप्रिय देश असला तरी त्याच्या संयमाची परीक्षा घेणा-यांना सडेतोड उत्तर द्यायला तो सदैव तयार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचेच एक सशक्त उदाहरण आहे. – जगदीश काळे

Check Also

व्हॉट्सअपची कोलांटउडी

व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना …