बेरोजगार किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही गोष्ट थक्क करणारी आहे. बेंगळुरूतील एका चहावाल्याची मासिक कमाई तब्बल तीन लाख रुपये आहे! पण खरं आश्चर्य त्याचं कमावणं नसून, त्याचं प्रत्येक दिवस आनंदाने जगणं आहे.
मुनिस्वामी डॅनियल, एक चौथीतून शाळा सोडलेला तरुण, पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करत असे. आज तो भारतातील सगळ्यांत लोकप्रिय पेय असलेला चहा विकून ’लखपती’ झाला आहे. त्याने सुरू केलेल्या शॅरन टी स्टॉल या चहाच्या गाड्यांची बेंगळुरूमध्ये सध्या तीन शाखा आहेत. त्याचं स्वप्न आहे की त्याचा चहा संपूर्ण भारतात पोहोचावा. आज डॅनियल हा अनेक तरुणांसाठी प्रेरणा बनला आहे. एक साधा चहा विकून महिन्याला तीन लाख रुपयांपर्यंत कमावता येतं, हे त्याने सिद्ध केलं आहे.
डॅनियलचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. आर्थिक अडचणींमुळे त्याला चौथीनंतर शाळा सोडावी लागली. केवळ १० व्या वर्षी त्याने कामाला सुरुवात केली. जे काही काम मिळेल ते करत राहिला पण मन काही लागत नव्हतं. शेवटचं काम त्याने ड्रायव्हर म्हणून सात वर्ष केलं. तरीही तो समाधानी नव्हता. आतून काहीतरी वेगळं करण्याची उर्मी होती.
अखेर २००७ मध्ये त्याने चहा विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला चहाविषयी फारशी आवडही नव्हती आणि कोणताही व्यावसायिक अनुभवही नव्हती. पण सकाळी चारला उठून चहा तयार करणे, दुकान उघडणे आणि दिवस भर विक्री करणे हाच त्याचा दिनक्रम राहिला. सुरुवातीला कमाई खूपच कमी होती. महिनेच्या महिने त्याच स्थितीत गेले.
कोणतंही यश सहज मिळत नाही. त्यासाठी कष्टांची आणि संयमाची गरज असते. डॅनियलने तेच केलं. ग्राहक कमी होते, विक्री संथ होती; पण डॅनियल थांबला नाही. तो आपल्या चहामध्ये नावीन्य आणू लागला. विविध फ्लेवर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करू लागला. हळूहळू लोक येऊ लागले, एकदा आलेला ग्राहक परत-परत येऊ लागला. त्याच्या चहाच्या गुणवत्तेने त्यांना खूश केलं. आणि इथूनच सुरू झाला त्याच्या यशाचा प्रवास.
आज डॅनियल बेंगळुरूतील एक सुप्रसिद्ध चहा विक्रेता आहे. त्याच्या टी स्टॉलवर दररोज १,००० हून अधिक कप चहा विकला जातो. त्याची वार्षिक उलाढाल ४० लाख रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे त्याच्या दुकानात चहाचे तब्बल १०० वेगवेगळे प्रकार मिळतात. डॅनियल सध्या ३० लोकांना नोकरीही देतो आहे.
शिक्षण, संसाधन किंवा अनुभव नसतानाही जर एखाद्या व्यक्तीमध्ये काही करून दाखवण्याची ऊर्मी असेल, तर कोणत्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. ही बाब मुनिस्वामी डॅनियल यांच्या वरील कहाणी वरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
ऊर्जादायी यशोगाथा
विल्यम कमक्वांबा यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी आफ्रिकेतील मलावी देशाच्या कसुलु नावाच्या एका खेड्यात …