हास्य हा उत्स्फूर्त मानवी भावनाविष्कार आहे. मानवी जगणे आनंददायी बनण्यासाठी हास्य ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. पण आपल्याला किंवा इतरांना हसू यावे यासाठी एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा, परिस्थितीचा समाजघटकाचा किंवा ओळखीचा उपमर्द करणे, अवहेलना करणे किंवा अश्लील शेरेबाजी करणे याचा अधिकार कोणालाही दिलेला नाहीये. ही बाब आपल्या कुटुंबाच्या आणि भवतालातल्या संस्कारांमधून मनावर आपोआपच रुजलेली असते. सुसंस्कृत समाजात लोकांमध्ये याबाबतची जाण महत्त्वाची असते. त्यामुळेच हसण्या-हसवण्याच्या नावाखाली कुणालाही भावनिक इजा पोहोचवणे, कमी लेखणं किंवा अपमान करणे या गोष्टी मूठभरांकडून केल्या गेल्या तरी उर्वरितांकडून त्याबाबत आक्षेप घेतला जातो.
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली. त्यात एका लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमाच्या मुख्य सहभागी व्यक्तीसह सोशल मीडियावर प्रभाव असलेल्या पाच जणांना हजर राहण्याचे आदेश दिले. या सर्वांनी आपल्या कार्यक्रमात ‘स्पायनल मस्युलर अॅट्रॉफी’ या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची उपहासात्मक थट्टा केली. थोडक्यात टर उडवणार्या टिप्पण्या केल्या न्यायालयाने अशा प्रकारचे वक्तव्य करणार्या या सेलीब्रेटींना ‘हानीकारक’ आणि ‘मनोबल खच्ची करणारे’ ठरवत, अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाय आणि दंडात्मक कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच करायला हवे.
याचे कारण अलीकडील काळात विनोदी कार्यक्रमांमध्ये वापरली जाणारी भाषाशैली, हावभाव आणि विनोदाचा दर्जा पाहता अनेकदा त्यातून अपमान, अश्लीलता आणि खालच्या पातळीचे उद्गार ऐकायला मिळतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काही लोक अशा व्यासपीठांचा वापर विकृत भावना व्यक्त करण्यासाठी करताना दिसतात. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झूल पांघरुन चाललेले हे सर्व प्रकार मर्यादांचे कुंपण ओलांडत आहेत.
लोकशाही मूल्यांची जाणीव असलेला विनोदी कलाकार स्वतःच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करताना दुसर्याच्या अधिकारांचा, प्रतिष्ठेचाही विचार करतो. तो कधीच कुणाच्या दुःखावर, व्यंगावर, दुर्बलतेवर हसत नाही. अशा स्थितीत हास्यनिर्मितीसाठी दिव्यांग व्यक्ती किंवा वंचित घटकांचा उपहास करण्याची गरज जर कलावंतांना जाणवत असेल तर ते त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण म्हणावयास हवे. काही वेळा अशा कृती काही जणांना कदाचित मनोरंजन वाटू शकतात, पण समाजातील विशिष्ट घटकांचा उपहास करणं आणि त्यांच्या भावना दुखावणं ही प्रवृत्ती कोणत्याही सुसंस्कृत समाजात स्वीकारार्ह नाही.- अपर्णा देवकर
Check Also
व्हॉट्सअपची कोलांटउडी
व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना …