मराठी साहित्यविश्वाच्या समृद्ध परंपरेला निसर्गअभ्यासातून, पशुपक्ष्यांच्या अभ्यासातून मौलिक लेखन करुन अधिक समृद्ध करणारे अरुण्यऋषी, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने एका पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या लेखनातून व जीवनातून केवळ निसर्गसेवा व वन्यजीवाबद्दलची कळकळ आणि पर्यावरण संवर्धनाचा ध्यास दिसून आला. पर्यावरण संवर्धनाचा वसा जीवापाड जोपासलेला अरुण्यऋषी आज निसर्गाच्या कुशीत विसावला. त्यांची निसर्गाची भटकंती थांबली, पण त्यांच्या विचारांची, तत्त्वज्ञानाची आणि निसर्ग भक्तीची मशाल पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे.
हाराष्ट्राच्या मातीतून निसर्ग भक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे अरण्यऋषी, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला आणि अनंताच्या प्रवासाला हा निसर्गसखा निघून गेला. राष्ट्रपतींच्या हस्ते चितमपल्ली यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्कार प्रदान करुन त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव करण्यात आला होता. पुरस्कार स्वीकारुन दिल्ली येथून सोलापूरला परतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. ९३ वर्षीय चितमपल्ली यांनी जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत पशु- पक्षी आणि निसर्गसंपदेच्या संवर्धनाचा संकल्प जपला. त्यांच्या निधनाने निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव आणि मराठी साहित्य या चारही क्षेत्रातील एक अत्युच्च दीप मावळला.
निसर्गाशी, वनांशी, वनसृष्टीशी, वन्यजीवांशी आणि एकंदरीतच प्राणीमात्रांशी एकरुप झालेले साहित्यिक म्हणून अवघ्या मराठी वाचकरसिकांना ते सुपरिचित होते. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सोलापूरच्या टी. एम. पोरे विद्यालयात प्राथमिक तर नॉर्थकोर्ट टेनिकल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व तेथून ते इंटरमीजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना इंटरमीजिएट सायन्स पात्रतेनुसार सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, कोईमतूर येथे वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला. १९५८-६० या कालावधीत त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वन विभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव (मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर वन विभागातील बोटा, अकोला तालुयातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागांमध्ये कामे केली. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले. निवृत्तीच्या वेळी (१९९०) ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उपसंचालक पदावर होते. त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव कामगिरी केली. पक्षीतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांनी वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभागी होऊन निबंधवाचन केले. ते राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती आणि औरंगाबादच्या मराठी अभ्यासक्रम मंडळाचे सभासद होते. याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदाचे काम पाहिले. त्यांनी पक्षी ‘जाय दिगंतरा’, ‘जंगलाचं देणं’, ‘रानवाटा’, ‘शब्दांचं धन’, ‘रातवा’, ‘मृगपक्षीशास्त्र’ (संस्कृत-मराठी अनुवाद), ‘घरट्यापलीकडे’, ‘पाखरमाया’, ‘निसर्गवाचन’, ‘सुवर्णगरुड’, ‘आपल्या भारतातील साप’ (इंग्रजी-मराठी अनुवाद), ‘पक्षीकोश’, ‘आनंददायी बगळे’, ‘निळावंती’, ‘केशराचा पाऊस’ इत्यादी पुस्तके आणि ‘चकवा चांदणं’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. चितमपल्ली यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात ३६ वर्षेसेवा केली. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. त्यांनी एकूण ५ लाख किमी प्रवास केला. मारुती चितमपल्ली यांना १३ भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या आणि ३० वर्षेजपून ठेवलेल्या शेकडो डायर्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केलं. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी २५ पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.
मूळ तेलुगु भाषिक असलेल्या या दि ग्रेट माणसाने एक लाख नवीन शब्दाचा खजिना मराठी साहित्याला उपलब्ध करुन दिला आहे. त्यांनी आयुष्यभर वने,वन्यजीव व्यवस्थापन,वन्यप्राणी व पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले आहे. खरेच त्यांचे कर्तृत्व हे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे आहे. त्यांनी मराठीबरोबर संस्कृतचे अध्ययन केले असून जर्मन व रशियन भाषेचा अभ्यास केला आहे. या साहित्यसेवा व कामगिरीबद्दल त्यांना विविध संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आतापर्यत त्यांनी अनेक साहित्य व अधिवेशनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत. २००६ साली सोलापुरात भरलेल्या ७९ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान चितमपल्ली यांना मिळाला होता.
त्यांच्या अनेक पुस्तकांनी सामान्य वाचकांपासून पर्यावरण अभ्यासकांपर्यंत सर्वांना निसर्गाशी नव्याने जोडले. त्यांच्या शब्दातून निसर्ग जिवंत होत असे. वाचकांना पक्ष्यांच्या किलबिलाटांचा आवाज, वाघाच्या पावलांचा दबकत येणारा ठसा, पानांवरुन फिरणार्या वार्यांची झुळूक जाणवायची. संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यावरण चळवळीसाठी ते दीपस्तंभ ठरले. मारुती चितमपल्ली यांचा साधेपणा, निरलस स्वभाव, ज्ञानाचा प्रचंड साठा आणि निसर्गासाठी अखंड झिजवलेले आयुष्य अनेकांना प्रेरणा देणारे होते. ‘वन आणि माणूस’ यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. वन्यजीवांच्या संवर्धनात त्यांनी घडवलेल्या पिढ्या आजही त्यांच्या शिकवणीची साक्ष देतात. पद्मश्री सन्मान, अनेक साहित्य पुरस्कार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मान भूषवूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व साधेच राहिले. त्यांच्या लेखनातून व जीवनातून केवळ निसर्गसेवा व वन्यजीवाबद्दलची कळकळ आणि पर्यावरण संवर्धनाचा ध्यास दिसून आला. पर्यावरण संवर्धनाचा वसा जीवापाड जोपासलेला अरुण्यऋषी आज निसर्गाच्या कुशीत विसावला. त्यांची निसर्गाची भटकंती थांबली, पण त्यांच्या विचारांची, तत्त्वज्ञानाची आणि निसर्ग भक्तीची मशाल पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. त्यांच्या लेखनातून, त्यांच्या नोंदीमधून निसर्गाशी नाते जोपासण्याची प्रेरणा पुढील अनेक पिढ्यांना मिळत राहील. त्यांची निसर्गभक्ती, विचारधारा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पर्यावरण चळवळीत अमर राहील. त्यांच्या विचारांची नवी पहाट उदयाला येईल. चितमपल्ली यांच्या शब्दातून आणि कार्यातून निसर्ग चिंतनाची ही ज्योत सदैव प्रज्वलित राहील. -मिलिंद सोलापूरकर
Check Also
१.३५ लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता
राज्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या गु्ंतवणूक प्रस्तावांना बुधवारी मुख्यमंत्री …