लेख-समिक्षण

अतिसंरक्षणात्मक पालकत्व नकोच!

आजकाल अशा अनेक बातम्या येत असतात ज्यात मोठमोठ्या संस्थांमध्ये शिकणारी मुलं आयुष्याच्या छोट्या संघर्षांसमोर हरतात. व्यावहारिक ज्ञानाच्या अभावामुळे ते त्यांच्या जीवनात आणि नातेसंबंधात सुसंवाद राखू शकत नाहीत. असे का घडते? याचे कारण पालकांचे अतिसंरक्षणवादी कवच.
व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांचे संरक्षणात्मक वर्तुळ आवश्यकच आहे, परंतु ते केवळ एका मर्यादेपर्यंत. त्यापलीकडे जाऊन बालपणातील स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची संधी देखील मुलांना मिळायला हवी. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर म्हणतात, अतिसंरक्षणात्मक पालकत्वासाठी लोकप्रिय शब्द म्हणजे हेलिकॉप्टर पेरेंटिंग. अशा पालकांना त्यांच्या मुलांना कधीही शारीरिक किंवा भावनिक दुखापत होऊ द्यायची नसते. यासाठी ते स्वत: मुलांना गरजेपूर्वीच सर्व सुविधा पुरवतात. ते नेहमी मुलांना त्यांच्या देखरेखीखाली ठेवतात. त्यांना कोणताही निर्णय घेण्यास किंवा कोणतेही नवीन काम करण्यास बंदी घालतात. परिणामी, ही मुले मोठी होतात आणि जगाला सामोरे जावे लागते तेव्हा त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या कौशल्यांचा अभाव असतो. या संगोपनाचा मुलावर नकारात्मक परिणाम होतो.
डॉ. ज्योती कपूर म्हणतात, पालकांच्या अति-संरक्षणात्मक वर्तुळामुळे मुलांमधील आत्मविश्वास कमालीचा कमी होतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या कौशल्याचा वापर करून जगाला सामोरे जातो. अतिसंरक्षणात्मक वातावरण हे कौशल्य विकसित होऊ देत नाही. त्यामुळे अशा संगोपनातील मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो.
बरेचदा अशी मुलं मोठी झाल्यावर खूप भावूक होतात. कोणतेही काम जमले नाही तर त्यांना नैराश्य येऊ लागते. अशा वेळी ती एकतर आक्रमकपणे वागू लागतात किंवा उदासीन होतात.
अशा मुलांमध्ये न ऐकण्याची सवय विकसित होत नाही. इतर लोकांना ते नेहमी आवडावे अशी त्यांची इच्छा असते. यामुळे त्यांना खूप असुरक्षित वाटते.
अतिसंरक्षणात्मक पालकांची मुले मोठेपणी घाबरट बनतात, निर्णय घेण्यास असमर्थ ठरू शकतात. काय करायला हवं?
मुलाने पहिल्यांदा पाऊल टाकल्यापासून ते पहिल्या शालेय नृत्यापर्यंत, तुमचे मूल जीवनात अनेक नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. काहीतरी नवीन आणि रोमांचक करण्याचा प्रयत्न करण्याच्या या पहिल्या पावलापासून तुम्ही त्यांना घाबरवू नका. सुरक्षिततेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, परंतु तुमच्या मनातील भीती काढून टाका आणि मुलाला नवीन गोष्टी आणि अनुभव घेऊ द्या.
त्यांना रोजच्या कामात सहभागी करुन घ्या. त्यांची कामे त्यांनाच करायला सांगा. काही वाजवी नियम आणि मर्यादा निश्चित करा. पण त्यांना स्वावलंबी आणि स्वतः निर्णय घेण्यास सक्षम बनवा. तुम्ही त्या निर्णयांचे मार्गदर्शक बना. निर्णयकर्ते बनू नका. तरच ती मोठेपणी आव्हानांचा सामना करू शकतील.
शाळेतून घरी येताना मुलांना समस्या येतात तेव्हा ते त्यांना सामोरे जायलाही शिकतात. प्रत्येक छोट्या-छोट्या अडचणीत तुम्हीच सर्व काही करु लागलात तर ते या समस्येचा सामना करायला शिकू शकणार नाहीत.

Check Also

टोनिंग का गरजेचे?

स्वच्छ, निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी लेन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही तीन महत्त्वाची पावले आहेत. …