लेख-समिक्षण

अंतराळवीर शुभांशू शुलांनी रचला इतिहास

१९८४मध्ये भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे अवकाश मोहीमेवर गेले होते. त्यानंतर आता भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुला यांनी २५ जून रोजी दुपारी १२.०१ वाजता इतिहास रचला. शुभांशू शुला यांनी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘अ‍ॅसिऑम-४’ या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले आहे. नासाचे फॉल्कन-९ हे यान अवकाशात झेपावले आणि त्याबरोबर शुला यांनी ऐतिहासिक कामगिरी केली.
‘अ‍ॅसिऑम-४’ मोहिमेअंतर्गत अन्य तीन अंतराळवीरांबरोबर शुला यांनी अवकाशात उड्डाण केले आहे. फॉल्कन-९ या रॉकेटद्वारे त्यांनी अवकाशात उड्डाण केले. याआधी दि. ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहीमेवर गेले होते. ४१ वर्षांनंतर एक भारतीय अंतराळवीर आज अवकाशात झेपावला आहे. उड्डाण केल्यानंतर शुभांशू शुला यांनी अंतराळयानातून पहिला संदेश पाठवला आहे. ‘नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो, व्हॉट ए राइड… ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत आणि ही एक अद्भुत राइड होती. सध्या आम्ही पृथ्वीभोवती ७.५ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे, जो मला सांगत आहे की मी एकटा नाही, मी तुमच्या सर्वांसोबत आहे.‘, असा संदेश त्यांनी पाठवला.
शुभांशू शुला हे मूळचे लखनौचे रहिवासी असून ते वायूदलात ग्रुप कॅप्टन या पदावर कार्यरत आहेत. एक वर्षाचे प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर त्यांची नासाने या मोहीमेसाठी निवड केली आहे. शुभांशू शुला व त्यांचे सहकारी अंतराळवीर फॉल्कन-९ या रॉकेटशी जोडलेल्या ड्रॅगन या मायक्रो रॉकेटद्वारे अंवकाशात प्रवास करणार आहेत. त्यामुळे शुला यांचे यान अवकाशात स्थिरावल्यानंतर फॉल्कन-९ हे रॉकेट सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहे. पुढील २८ तासांत त्यांचे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी जोडले जाईल. त्यानंतर आंतराळ केंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला जाईल.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी जोडण्यासाठी या यानाला २८ तास लागणार आहेत. तत्पूर्वी पुढील २४ तासांत हे यान १६ वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे. त्यामुळे एका दिवसांत हे अंतराळवीर १६ वेळा सूर्योदय व १६ वेळा सूर्यास्त पाहतील. शुभांशू शुला हे या मोहिमेचे सारथ्य करत असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ते १५ दिवस राहणार आहे. या काळात ते शून्य गुरुत्वाकर्षणात काही प्रयोग करणार आहेत. नासा व भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो या दोन दिग्गज अंतराळ संशोधन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे. इस्रो व नासाने केलेल्या संयुक्त कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीर पाठवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एस’वर लिहिले की, भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय बनण्याच्या मार्गावर आहेत. ते आपल्यासोबत १.४ अब्ज भारतीयांच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा घेऊन गेले आहेत. त्यांना आणि इतर अंतराळवीरांना यशासाठी शुभेच्छा, असे ते म्हणाले. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ‘एस’वर लिहिले की, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुला यांनी भारतासाठी अंतराळात एक नवीन मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. संपूर्ण देश एका भारतीयाच्या अंतराळ प्रवासावर उत्साही आणि गौरवान्वित आहे.

Check Also

१.३५ लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता

राज्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या गु्ंतवणूक प्रस्तावांना बुधवारी मुख्यमंत्री …